

पुढारी ऑनलाईन डेस्क : महान फिरकी पटू व ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू शेन वॉर्न ( shane warne ) याचा ह्रदय विकाराच्या झटकाने अकाली निधन झाले. वयाच्या ५२ वर्षीच त्याला जीवनाच्या मैदानातून माघार घ्यावी लागली आहे. त्याच्या जाण्याने क्रिकेट विश्वाला मोठा धक्का बसला आहे. त्याने आपल्या फिरकीने अवघ्या विश्वाला एकप्रकारे मैदानावर नाचवले. त्याने त्याच्या काळातल्या अनेक दिग्गज फलंदाजांच्या मनात धडकी भरवली होती. आज ही त्याने घेतलेले बळी चाहत्यांना आठवतात. मैदानासह मैदानाच्या बाहेर देखिल तो नेहमी चर्चेत राहणारा व्यक्ती ठरला होता.
१९९३ सालच्या ॲशेस मालिकेत मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड कसोटीत शेन वॉर्न ( shane warne ) या महान गोलंदाजाने इंग्लंडचा फलंदाज माईक गॅटिंगला बाद केलेला चेंडू क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम चेंडू असल्याचे म्हटले जाते. त्या चेंडूने शेन वॉर्नचे आयुष्यच बदलून टाकले. या गोलंदाजाने मनगटाच्या जादूने आपल्या काळातील जवळपास सर्वच दिग्गजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. वॉर्नने त्याच्या 145 सामन्यांच्या कसोटी कारकिर्दीत 708 बळी घेतले. तर त्याने १९४ एकदिवसीय सामने खेळले यात त्याने २९३ बळी घेतले.
वॉर्नने माईक गॅटिंगला लेगसाईडला चेंडू टाकला. चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाहेर होता त्यामुळे गॅटिंगला तो वाईड जाईल असे वाटले. दरम्यान, चेंडू वेगाने वळला आणि गॅटिंगला चकमा देत त्याच्या ऑफ स्टंपवर आदळला, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
वॉर्नने 4 वर्षांपूर्वी म्हणजे 24 वर्षांनंतर कबूल केले की 'बॉल ऑफ द सेंच्युरी' हा तोच चेंडू होता जो सर्व लेगस्पिन गोलंदाज टाकण्याचा प्रयत्न करतात. या चेंडूने मैदानावर आणि मैदानाबाहेर माझे आयुष्य बदलले. मी शतकातील चेंडू टाकला याचा मला खूप अभिमान आहे. विशेषत: माईक गॅटिंगसारखा महान खेळाडू, जो इंग्लंड संघात फिरकी गोलंदाजीत निष्णात होता तोच या चेंडूवर बाद झाला.