सर्गियो स्टॅकोस्की या टेनिसपटूने रॅकेट सोडून हातात घेतली बंदूक | पुढारी

सर्गियो स्टॅकोस्की या टेनिसपटूने रॅकेट सोडून हातात घेतली बंदूक

कीव्ह : युक्रेनचा 36 वर्षांचा टेनिसपटू सर्गियो स्टॅकोस्की यानेही टेनिस रॅकेट सोडून आता देशासाठी बंदूक हातात घेतली आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाचा भडका उडाला आहे. रशियाने चार दिवसांपूर्वी युक्रेनमध्ये सैन्य कारवाई सुरू करत आपले लष्कर युक्रेनमध्ये घुसवले. याला प्रतिकार करण्यासाठी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियाचे आक्रमण थोपवण्यासाठी हातात शस्त्रे घेण्याचे आवाहन केले होते.

त्यानंतर युक्रेनमधील सामान्य नागरिक तसेच प्रसिद्ध व्यक्तीदेखील आपल्या देशासाठी हातात शस्त्रे घेत आहेत. स्टॅकोस्की याने सांगितले की, तो रशियाच्या आक्रमणाचा मुकाबला करण्यासाठी देशाच्या लष्करात सामील झाला आहे. स्टॅकोस्की हा जागतिक टेनिस क्रमवारीत 31 व्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे 2013 ला त्याने विम्बल्डनमध्ये रॉजर फेडररचा पराभव केला होता. सर्गियो स्टॅकोस्की म्हणाला की, एकदा का त्याची पत्नी आणि मुले हंगेरीत सुरक्षित पोहोचले की तो हातात शस्त्र घेऊन लढण्यास सज्ज होईल.

स्काय न्यूजला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणतो की, ‘नक्कीच मी लढणार. मी गेल्याच आठवड्यात लष्कराच्या अतिरिक्त तुकडीत सामील झालो आहे. मला लष्करी अनुभव नाही, मात्र मी बंदूक चालवली आहे. माझ्याकडे बंदूक आहे.’ स्टॅकोस्कीने आपल्या या निर्णयावर कुटुंबीयांची काय प्रतिक्रिया होती हेही सांगितले. तो म्हणाला की, ‘माझे वडील आणि भाऊ दोघेही सर्जन आहेत. ते या निर्णयामुळे तणावात आले आहे. मात्र, मी त्यांच्याशी सातत्याने बोलत आहे. ते बेसमेंटमध्ये झोपतात.’

Back to top button