

पुढारी ऑनलाईन डेस्क : न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजविरुद्धची टी-20 मालिका जिंकल्यानंतर आता भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माचे (Rohit Sharma) श्रीलंकेवर विजय मिळणे हे लक्ष्य आहे. टीम इंडिया तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 24 फेब्रुवारीला लखनऊमध्ये खेळणार आहे. यानंतर 26 आणि 27 फेब्रुवारीला धर्मशाला येथे दोन सामने होणार आहेत.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) श्रीलंकेविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वी सराव करतानाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. रोहितच्या या फोटोवर त्याची पत्नी रितिका सजदेहने मजेशीर कमेंट केली आहे. तिच्या कमेंटनंतर सोशल मीडियावर चर्चेचा धुरळा उडाला आहे.
'पुढच्या मिशनसाठी सज्ज. श्रीलंका.' असे कॅप्शन लिहून हिटमॅन रोहितने (Rohit Sharma) इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यावर भाष्य करताना रितिका सजदेहने रोहितला चक्क कमेंटमधून बाउन्सर टाकला आहे. तिने लिहिलंय की, 'सर्व ठीक आहे, पण तु मला कॉलबॅक करू शकतोस का?'. रितिकाच्या या या मजेशीर कमेंटला हजारो लोकांनी लाईक केले आहे. मात्र, रोहितने आपल्या पत्नीच्या कमेंटला अद्याप कोणतेही उत्तर दिलेले नाही.
रोहित आणि रितिका यांची प्रेमकहाणी खूपच वेगळी आहे. एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान दोघांची भेट झाली. रोहितसोबत युवराज सिंग आणि इरफान पठाणही त्या जाहिरातीत होते. रोहित सीनियर खेळाडू युवराजला भेटायला गेला होता. तिथे युवीच्या शेजारी रितिकाही उपस्थित होती. दोघांची पहिली भेट तिथेच झाली.
रोहितने (Rohit Sharma) एका मुलाखतीत सांगितले होते की, शूटिंगदरम्यान तो रितिकाकडे रागाने पाहत होता कारण युवराज सिंगने पाहण्यास नकार दिला होता. रोहितला वाटले की रितिकामध्ये खूप अहंकार आहे. मात्र, जाहिरातीचे शूटिंग करताना रोहित घाबरला होता. दिग्दर्शकाने त्याला मदतीसाठी विचारणा केली, पण रोहितने साफ नकार दिला. त्यानंतर तो शॉट देण्यासाठी गेला तेव्हा रितिका तिथे उपस्थित होती.
यावेळी रितिकाने रोहितशी संवाद साधत तुला जर मदतीची आवश्यकता असल्यास सांगण्याचे आवाहन केले. दोघांमधला हा पहिलाच संवाद होता. यानंतर हिटमॅन आणि रितिका यांची चांगली मैत्री झाली. त्यानंतर एकमेकांना डेट करायला सुरुवात केली आणि अखेर २०१५ मध्ये त्यांनी विवाह केला. भारतीय क्रिकेट जगतातील सुंदर जोडप्यांपैकी एक असलेल्या रितिका आणि रोहितचे १३ डिसेंबर २०१५ रोजी लग्न झाले. यानंतर ३० डिसेंबर २०१८ रोजी दोघेही पालक झाले. रितिकाने मुलगी समायराला जन्म दिला. रितिका मुलगीसह सध्या मुंबईत आहे. ती रोहितसोबतच्या बायो-बबलचा भाग राहिलेली नाही. भारतीय संघाच्या अनेक दौऱ्यांमध्ये रितिका रोहितसोबत असते, पण सध्या हिटमॅन भारतात आहे, त्यामुळे तिने मुंबईतच राहणे पसंत केले.