सामन्याचा निकाल लागेपर्यंत रंगणार ‘सुपर ओव्हर’चा थरार, ICC चा मोठा निर्णय | पुढारी

सामन्याचा निकाल लागेपर्यंत रंगणार ‘सुपर ओव्हर’चा थरार, ICC चा मोठा निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क : न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या महिला विश्वचषक स्पर्धेतील नियमांमध्ये आयसीसीकडून धक्कादायक बदल करण्यात आले आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका लक्षात घेता सर्व संघांना केवळ ९ खेळाडूंसह मैदानात उतरण्याची परवानगी देण्यात आली आहे. याबाबत आयसीसी (ICC)ने एक निवेदन जारी करून याची माहिती दिली आहे. जर एखाद्या संघातील खेळाडूंची प्रकृती कोरोना संसर्गामुळे बिघडली तर तो संघ केवळ ९ खेळाडूंसह मैदानात उतरू शकतो, असा महत्त्वपूर्ण निर्णय आयसीसीने घेतला आहे. न्यूझीलंडमध्ये ४ मार्च ते ३ एप्रिल दरम्यान महिला विश्वचषक खेळवला जाणार आहे.

आयसीसीचे हेड ऑफ इव्हेंट क्रिस टेटली म्हणाले की, ‘कोरोनाच्या दृष्टीकोनातून, आम्हाला अधिक सूट देण्याची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर आयसीसीने नियमांमध्ये हे बदल केले आहेत, जेणेकरून स्पर्धेदरम्यान खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाला तरी सामना थांबू नये आणि स्पर्धा सुरळीत पार पडू शकेल. यासोबतच सामना बरोबरीत सुटल्यास त्याचा निकाल सुपर ओव्हरद्वारे लागेल, असा निर्णय आयसीसीने घेतला आहे. जर सुपर ओव्हरमध्येही सामना देखील बरोबरीत सुटला तर आणखी एक सुपर ओव्हर होईल. सामन्याचा निकाल घोषित होईपर्यंत सुपर ओव्हर चालू राहतील,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

यापूर्वी अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेदरम्यान भारताच्या अर्ध्या संघाला कोरोनाची लागण झाली होती. अशा स्थितीत भारताने मोठ्या कष्टाने आपला संघ मैदानात उतरवला होता. मात्र, यादरम्यान टीम इंडियाला युगांडा आणि आयर्लंडसारख्या संघांविरुद्ध खेळावे लागले. टीम इंडियाने ते दोन्ही सामने सहज जिंकले असले तरी महिला विश्वचषकात असे होणार नाही. ही परिस्थिती टाळण्यासाठी आयसीसीने सर्व संघांसाठी नवा नियम जारी केला आहे.

टेटली म्हणाले की, यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत अधिकृतपणे संघातील खेळाडूंची संख्या केवळ १५ आहे, परंतु राखीव म्हणून संघ त्यांच्यासोबत अनेक अतिरिक्त खेळाडू पाठवू शकतात. अशा परिस्थितीत कोणत्याही संघातील खेळाडूंना कोरोना झाल्याचे आढळल्यास राखीव खेळाडूंना संघात समाविष्ट केले जाऊ शकते. साखळी सामन्यांमध्ये सर्व संघ एकमेकांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळतील आणि त्यानंतर पहिले चार संघ ठरवले जातील.

जर कोरोना संसर्ग वाढला आणि कोणत्याही दोन संघांमधील सामना आयोजित करणे कठीण झाले तर तो सामना नंतर आयोजित केला जाईल. मात्र, प्रत्येक संघाने पूर्ण लवचिकता दाखवणे अपेक्षित आहे. २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेप्रमाणे या स्पर्धेतील चौकारांच्या संख्येच्या आधारावर विजेता ठरवला जाणार नाही. निकाल लागेपर्यंत सामना सुपर ओव्हरमध्ये खेळला जाईल, असेही टेटली यांनी सांगितले.

आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धा न्यूझीलंडमध्ये ४ मार्च २०२२ पासून सुरू होणार आहे. पहिला सामना यजमान न्यूझीलंड आणि क्वालिफायर संघाविरुद्ध होईल. तर अंतिम सामना ३ एप्रिल रोजी क्राइस्टचर्च येथे खेळवला जाईल.

 

Back to top button