Ranji Trophy 2022 : पुन्हा एकदा रहाणे, पुजारा यांच्यावर लक्ष | पुढारी

Ranji Trophy 2022 : पुन्हा एकदा रहाणे, पुजारा यांच्यावर लक्ष

अहमदाबाद ; वृत्तसंस्था : भारतीय कसोटी संघातून वगळण्यात आलेले अजिंक्य रहाणे आणि चेतेश्‍वर पुजारा गुरुवारपासून सुरू होणार्‍या रणजी करंडक (Ranji Trophy 2022) स्पर्धेतील ग्रुप गटाच्या दुसर्‍या फेरीतील सामन्यादरम्यान चांगल्या कामगिरीचा प्रयत्न करतील.

मुंबईचा संघ एलिट ग्रुप ‘डी’मध्ये गोव्याचा सामना करेल. यामध्ये रहाणेचा मोठी खेळी करण्याचा प्रयत्न असेल. रहाणेने सौराष्ट्रविरुद्ध पहिल्या सामन्यात 129 धावा केल्या होत्या. तरीही श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी त्याची निवड करण्यात आली नाही. हा सामना ड्रॉ राहिला होता आणि पुजाराला पहिल्या डावात खातेही उघडता आले नाही; पण त्याने दुसर्‍या डावात 91 धावांची खेळी केली.

पुजारा पुन्हा ओडिशा विरुद्ध होणार्‍या लढतीत मोठी खेळी करण्याचा प्रयत्न करेल. मुंबई आणि गोवा दरम्यानच्या लढतीत सरफराज खानकडे सर्वांचे लक्ष असेल. ज्याने गेल्या सामन्यात 275 धावांची खेळी केली होती. मुंबईचा प्रयत्न या लढतीत पूर्ण गुण मिळवण्याचा असेल. गुवाहाटीमध्ये दिल्ली आणि झारखंडमध्ये होणार्‍या लढतीत जलदगती गोलंदाज ईशांत शर्माशिवाय युवा सलामी फलंदाज यश धूलवर देखील सर्वांचे लक्ष असेल. (Ranji Trophy 2022)

भारताच्या 19 वर्षांखालील संघाचा कर्णधार धूलने तामिळनाडूविरुद्ध पदार्पण सामन्यातील दोन्ही डावांत शतक झळकावले होते. आपला फॉर्म कायम ठेवत दिल्लीला पूर्ण गुण मिळवून देण्याचा त्याचा प्रयत्न असेल. ग्रुप ‘एच’ मधील अन्य सामना तामिळनाडू आणि छत्तीसगड दरम्यान खेळविण्यात येईल. तामिळनाडूच्या शाहरूख खानने गेल्या लढतीत 194 धावांची खेळी केली होती. छत्तीसगडने गेल्या लढतीत झारखंडला पराभूत केले होते. त्यामुळे ते गटात अव्वल स्थानी आहेत.

नवी दिल्लीत होणार्‍या ग्रुप ‘एफ’ मध्ये पंजाब व हरियाणा आणि हिमाचल प्रदेश व त्रिपुरा एकमेकांसमोर असतील. ग्रुप ‘ए’ मध्ये केरळ व मध्य प्रदेश आपली विजयी मोहीम कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील. प्लेट ग्रुपमध्ये सर्वांचे लक्ष बिहारच्या सकीबुल गनीवर असेल. त्याने मिझोराम विरुद्ध आपल्या प्रथम श्रेणी पदार्पण सामन्यात त्रिशतक (341 धावा) झळकावत इतिहास रचला होता. बिहारची गाठ आता सिक्‍कीमशी आहे. (Ranji Trophy 2022)

Back to top button