क्वीन्सटाउन (न्यूझीलंड); पुढारी ऑनलाईन : क्वीन्सटाउन येथे खेळल्या गेलेल्या एकमेव टी-20 सामन्यात न्यूझीलंड महिला संघाने भारतीय महिला संघाचा 18 धावांनी पराभव केला (NZvsIND). प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने निर्धारित 20 षटकात 5 गडी गमावून 155 धावा केल्या. 156 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा महिला संघ 8 विकेट गमावून केवळ 137 धावाच करू शकला.
भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 7.5 षटकांत 60 धावांची उत्कृष्ट भागीदारी केली. सुझी बेट्सने 34 चेंडूत 36 तर कर्णधार सोफी डिव्हाईनने 23 चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 31 धावा केल्या. मधल्या फळीत अमेलिया कारने 20 चेंडूत 17 आणि मॅडी ग्रीनने 20 चेंडूत 26 धावा केल्या. याशिवाय ली तैहूनेही 14 चेंडूत 27 धावांची शानदार खेळी खेळली. भारताकडून पूजा वस्त्राकर आणि दीप्ती शर्माने प्रत्येकी 2 बळी घेतले. (NZvsIND)
लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने चांगली सुरुवात केली आणि पहिल्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी केली. यास्तिका भाटियाने 26 चेंडूत 26 आणि शेफाली वर्माने 13 धावा केल्या. मात्र, यानंतर संघाची मधली फळी फ्लॉप झाली. कर्णधार हरमनप्रीत कौर केवळ 12 धावाच करू शकली. तर नवीन खेळाडू सबनेनी मेघनाने 30 चेंडूत 37 धावा खेळून संघाच्या विजयासाठी सर्वोत्तम प्रयत्न केला. मात्र, तिला उर्वरित फलंदाजांची साथ मिळाली नाही. त्यामुळे संपूर्ण 20 षटके खेळूनही भारतीय संघ 8 विकेट्सच्या मोबदल्यात केवळ 137 धावाच करू शकला. न्यूझीलंडच्या जेस केर, अमेलिया केर, हेली जेन्सन यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. तर लया तहहू आणि सोफी डिव्हाईन हिने प्रत्येकी 1-1 बळी घेतला. (NZvsIND)
आता 12 ते 24 फेब्रुवारी दरम्यान दोन्ही संघांमध्ये 5 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. सर्व सामने क्वीन्सटाऊन येथे होणार आहेत. (NZvsIND)