पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाचा माजी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळेने (anil kumble) ७ फेब्रुवारी १९९९ ला कसोटी सामन्याच्या एका डावात १० बळी घेण्याचा विक्रम केला होता. दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर जंबोने पाकिस्तानविरुद्ध त्याने हा महापराक्रम केला होता. २३ वर्षांपूर्वी केलेला हा विक्रम चाहते आजही विसरलेले नाहीत. त्याच्या त्या अविस्मरणीय कामगिरीची नोंद भारतीय आणि जागतिक क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात नोंदवली गेली आहे.
दरम्यान, दोन कसोटी सामन्यातील पहिला सामना पाकिस्तानने १२ धावांनी जिंकला होता. त्यामुळे त्यांनी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली होती. आता अखेरच्या दिल्लीच्या फिरोजशाहा कोटला मैदानावरील सामना जिंकणे भारतासाठी गरजेचे होते. भारताने दुसऱ्या डावात पाकिस्तानसमोर विजयासाठी ४२० धावांचे लक्ष्य दिले होते. हा सामना ड्रॉ होईल असे वाटत होते. पण कुंबळेने वर्ल्ड रेकॉर्ड करत पाकिस्तानचा पराभव केला. कुंबळेने (anil kumble) पाकिस्तानच्या दुसऱ्या डावात एकट्याने सर्वांना बाद केले.
दिल्लीत दुसऱ्या कसोटीत मोहम्मद अझरुद्दीनने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने पहिल्या डावात २५२ धावा केल्या. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानचा पहिला डाव १७२ धावांत गुंडाळला. यानंतर सलामीवीर सदागोपन रमेश (९६), सौरभ गांगुली (६२) आणि जवागल श्रीनाथ (४९) यांच्या फलंदाजीच्या जोरावर भारताने ३३९ धावांपर्यंत मजल मारली. याच बरोबर पाहुण्या पाकिस्तान संघासमोर विजयासाठी ४२० धावांचे लक्ष्य ठेवले. पाकिस्तानच्या संघाला हा सामना अनिर्णित ठेवायचा होता आणि त्याच इराद्याने त्यांचे सलामीवीर मैदानात उतरले. पण भारताचा दिग्गज फिरकीपटू कुंबळेने पाकच्या आशा धुळीस मिळवल्या आणि भारतीय संघाला २१२ धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला.
फिरोजशाहा कोटला मैदानावरील कसोटी ड्रॉ करण्यासाठी पाकिस्तानच्या खेळाडूंनी सर्व प्रयत्न केले. सइद अन्वर आणि शाहीद आफ्रिदी यांनी पहिल्या विकेटसाठी १०१ धावांची भागिदारी केली. भारत मालिका गमावेल की काय असे वाटत असतानात कुंबळेने २४.२ व्या षटकात पाकिस्तानला पहिला झटका देत सलामीची जोडी फोडली. त्याने आफ्रिदीला (४१) पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतरच्या पुढच्याच चेंडूवर (२४.३) एजाज अहमदला (०) बाद करत पाकिस्तानला सलग दोन धक्के दिले. त्यानंतर कुंबळेने दोन-तीन षटकांच्या फरकाने इमजमाम उलहक (६) आणि मोहम्मद युसुफ (०) यांच्या विकेट मिळवल्या. पाकिस्तानने १४ धावांत ४ विकेट गमावल्या. यावेळी त्यांची अवस्था ४ बाद ११५ झाली होती.
मोइन खान (३) देखील स्वस्तात माघारी परतला. पाच विकेट घेतल्यानंतर त्याने पाकिस्तानची मोठी विकेट मिळवली. सईद अन्वरला कुंबळेने ६९ धावांवर बाद केले. याचबरोबर सामन्याच्या चौथ्या दिवशी पाक बॅकफुटवर गेला. कुंबळेने पुढे सलीम मलिक (१५), मुश्ताक अहमद (१), सकलेन मुश्ताक (०) यांना माघारी धाडून पाकची अवस्था ९ बाद १९८ केली. इतिहास घडवण्यासाठी कुंबळेला फक्त एका विकेटची गरज होती. मैदानावर वासीम अकरम आणि वकार युनुस होते. एका बाजूने कुंबळे तर दुसऱ्या बाजूने श्रीनाथ गोलंदाजी करत होता. श्रीनाथ जाणीवपूर्वक विकेटच्या सोडून गोलंदाजी करत होता जेणेकरून कुंबळेला १०वी विकेट मिळेल. पाकिस्तानच्या अखेरच्या जोडीने १४ चेंडू खेळले आणि १५व्या चेंडूवर अनिल कुंबळेने अकरमला लक्ष्मण करवी झेलबाद केले. पाकचा २०७ धावांवर ऑलआऊट झाला. याचबरोबर कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा एका डावात सर्व १० विकेट घेण्याचा पराक्रम त्याच्या नावावर नोंदवला गेला. २६.३ षटके गोलंदाजी करताना कुंबळेने ७४ धावांत १० बळी घेतले. या विक्रमाबरोबर भारताने हा सामना २१२ धावांनी जिंकला.
बंगळूरमध्ये जन्मलेल्या कुंबळेच्या नावावर १३२ कसोटीत एकूण ६१९ विकेट आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने २७१ सामन्यात एकूण ३३७ बळी घेतले आहेत. कुंबळेच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकूण ११३६ विकेट आहेत. कुंबळे कसोटी डावात १० बळी घेणारा दुसरा आणि पहिला भारतीय गोलंदाज ठरला. त्याच्या आधी जिम लेकरने कसोटी डावात सर्व १० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. कुंबळेने सामन्याच्या पहिल्या डावात ४ विकेट्स घेतल्या आणि एकूण १४ विकेट्स घेऊन तो सामनावीर ठरला.
१०१/१: शाहिद आफ्रिदी (41) नयन मोंगियाने झेलबाद केले.
१०१/२: इजाज अहमद (०) याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
११५/३: इंझमाम-उल-हक (६) बोल्ड केले.
११५/४: मोहम्मद. युसूफ (०) ला एलबीडब्ल्यू आऊट केले.
१२७/५: मोईन खान (३) गांगुलीने झेल पकडला.
१२८/६: सईद अन्वर (६९) व्हीव्हीएस लक्ष्मणने झेलबाद केले.
१८६/७: सलीम मलिक (१५) बोल्ड झाला.
१९८/८: मुश्ताक अहमद (१) राहुल द्रविडकरवी झेलबाद झाला.
१९८/९: सकलेन मुश्ताकला (०) एलबीडब्ल्यू आऊट केले.
२०७/१०: वसीम अकरम (३७) लक्ष्मणकरवी झेलबाद केले.