IND vs SL : भारत-श्रीलंका कसोटी, T20 मालिकेच्या वेळापत्रकात मोठा बदल!, विराट कोहली 100वी कसोटी ‘या’ मैदानावर खेळणार | पुढारी

IND vs SL : भारत-श्रीलंका कसोटी, T20 मालिकेच्या वेळापत्रकात मोठा बदल!, विराट कोहली 100वी कसोटी ‘या’ मैदानावर खेळणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी श्रीलंकेचा संघ भारताच्या दौ-यावर कसोटी आणि T20 मालिका (IND vs SL) खेळण्यासाठी येत आहे. वेळापत्रकानुसार पहिल्यांदा कसोटी मालिका आणि नंतर टी-20 मालिका होणार होती, मात्र आता यात मोठा बदल करण्यात आला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील T20 मालिका 24 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे, तर कसोटी मालिकेतील पहिला सामना मोहालीच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळवला जाईल, जो भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा (Virat Kohli) 100 वा सामना असू शकतो.

हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन आणि उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनने खात्री केली आहे की, T20 मालिकेचे सामने त्यांच्या मैदानावर खेळवले जातील. लखनौ येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर 24 फेब्रुवारी रोजी पहिला T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळवला जाईल. त्यानंतर मालिकेतील शेवटचे दोन सामने 26 आणि 27 फेब्रुवारीला एचपीसीएच्या (HPCA) धर्मशाला स्टेडियमवर खेळवले जातील. याशिवाय पहिला कसोटी सामना 3 ते 7 मार्च या कालावधीत मोहालीत आणि दुसरा सामना 12 मार्चपासून बंगळूरमध्ये खेळवला जाईल. दरम्यान, बंगळूरच्या चिन्नास्वामी मैदानावरील कसोटी सामना डे-नाईट खेळवला जाणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. (IND vs SL)

दरम्यान, कसोटी मालिकेपूर्वी संघ निवडण्यासाठी निवड समितीच्या बैठकीची वेळ जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु चेतन शर्माच्या नेतृत्वाखालील होणा-या समितीची बैठकीत रोहित शर्माला कसोटी संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. रोहित शर्मा सध्या टीम इंडियाच्या टी 20 आणि वनडे संघाचा पूर्णवेळ कर्णधार आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कसोटी मालिकेतील पराभवानंतर कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर हे पद रिकामे असून लवकरच कसोटी संघाच्या कर्णधाराची घोषणा केली जाईल अशी शक्यता आहे. (IND vs SL)

PAK vs AUS : पाकिस्तान दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ जाहीर!

Back to top button