IND vs WI ऐतिहासिक सामन्यात भारताचा सहज विजय | पुढारी

IND vs WI ऐतिहासिक सामन्यात भारताचा सहज विजय

अहमदाबाद ःवृत्तसंस्था : आपला हजारावा सामना खेळणार्‍या टीम इंडियाने वेस्ट इंडिजवर सहा गड्यांनी मात करत एकदिवसीय मालिकेचा विजयाने दिमाखात प्रारंभ केला. विंडीजने दिलेल्या 176 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग भारताने 4 गड्यांच्या मोबदल्यात अवघ्या 28 षटकांतच पूर्ण केला. या विजयात रोहित शर्माने (60) अर्धशतकी खेळी करत कर्णधाराची भूमिका चोखपणे पार पाडली. भारताच्या भेदक गोलंदाजीने वेस्ट इंडिजची हवा काढून घेतल्यानंतर कर्णधार रोहित शर्माचा तडाखा विंडीजला बसला. रोहित शर्माने तडाखेबाज फलंदाजी करत आक्रमक अर्धशतक बनवले. अर्धशतकी खेळीनंतर रोहित शर्मा 60 (51) धावांवर बाद झाला. रोहितनंतर खेळण्यास आलेल्या विराट कोहलीला मात्र फार काही करता आले नाही. त्याला फक्त आठ धावा करून माघारी परतवावे लागले. चांगल्या सुरुवातीनंतर भारताची मधली फळी ढेपाळली. (IND vs WI)

ऋषभ पंतही (11) लवकर बाद झाल्याने बिनबाद 84 वरून भारताचा डाव 4 बाद 116 असा अडचणीत आला. परंतु सूर्यकुमार यादव (नाबाद 34) आणि पदार्पण करणार्‍या दीपक हुडा (26) यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. भारत दौर्‍यावर आलेल्या वेस्ट इंडिज संघास पहिल्या एकदिवसीय सामन्यात 43.5 षटकांत 176 धावांत गारद होण्याची नामुष्की ओढवली. जेसन होल्डर 57 (71) व फॅबेन अ‍ॅलन 29 (43) वगळता कोणालाही भारताच्या गोलंदाजीचा सामना करता आला नाही. ठराविक अंतरावर विंडीजच्या फलंदाजांनी आपल्या विकेट बहाल केल्या. भारताकडून यजुवेंद्र चहल हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. या सामन्यात 4 बळी घेत कारकिर्दीत 100 बळी घेण्याचा महत्त्वपूर्ण ठप्पा त्याने पार केला. चहलसह वॉशिंग्टन सुंदर यानेही 3 बळी पटकावले. (IND vs WI)

संक्षिप्त धावफलक :

वेस्ट इंडिज : 43.5 षटकांत सर्वबाद 176. (जेसन होल्डर 57, फॅबेन अ‍ॅलेन 29. यजुवेंद्र चहल 4/49, सुंदर 3/30.)
भारत : 28 षटकांत 4 बाद 178. (रोहित शर्मा 60, सुर्यकुमार यादव 34. अल्झारी जोसेफ 2/45.)

हेही वाचलत का?

Back to top button