Kieron Pollard : पोलार्डने गाणं गाऊन मुलाखतीची सुरुवात केली, अन्…(Video) | पुढारी

Kieron Pollard : पोलार्डने गाणं गाऊन मुलाखतीची सुरुवात केली, अन्...(Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंग्लंड विरुद्ध खेळल्या गेलेल्या पाचव्या आणि शेवटच्या टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यात जेसन होल्डरच्या शानदार गोलंदाजीमुळे वेस्ट इंडिजने हा सामना १७ धावांनी जिंकला. या विजयासह कॅरेबियन संघाने मालिका ३-२ अशी जिंकली. या शानदार विजयानंतर वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी जल्लोष केला. त्यांचा कर्णधार किरॉन पोलार्ड (Kieron Pollard) तर विशेष आनंदात होता.

यादरम्यान, जेव्हा सामना संपल्यानंतर पोलार्डला (Kieron Pollard) मुलाखतीसाठी बोलावण्यात आले तेव्हा तो मुलाखत सुरू करण्यासाठी गाणे गाताना दिसला. त्याचा हा व्हिडिओ क्रिकेट वेस्ट इंडिजच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो चाहत्यांना खूप आवडला आहे. क्रिकेट वेस्ट इंडिजने कॅप्शनमध्ये असेही लिहिले आहे की, क्रिकेटच्या इतिहासातील तो पहिला कर्णधार आहे ज्याने गाणे गाऊन मुलाखतीची सुरुवात केली.

कॅप्टन किरॉन पोलार्डने (Kieron Pollard) गायलेले हे गाणे जमैकन संगीतकार सिझलाचे असून या गाण्याचे बोल आहेत ‘सॉलिड अॅज अ रॉक’ (Solid as a Rock). पोलार्डला हे गाणे गुणगुणताना पाहून समालोचकही हसायला लागतो. हे पाहून सोशल मीडियावरील चाहते या व्हिडिओचे वेडे झाले आहेत.

या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर होल्डरने २.५ षटकात २७ धावा देत ५ बळी आपल्या खात्यात जमा केले. यासह जेसन होल्डर हा टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजसाठी हॅटट्रिक घेणारा पहिला खेळाडू ठरला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने १७९ धावा केल्या होत्या. पण प्रत्युत्तरात इंग्लिश संघ फक्त १६२ धावा करू शकला आणि १७ धावांनी सामना गमावला.

Back to top button