Rishabh Pant : पहिल्या वन-डेत ऋषभ उपकर्णधार? | पुढारी

Rishabh Pant : पहिल्या वन-डेत ऋषभ उपकर्णधार?

अहमदाबाद; पुढारी ऑनलाईन : भारतीय संघ 2022 मध्ये भारतात पहिली क्रिकेट मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. विराट कोहलीच्या कर्णधारपदाचे यशस्वी पर्व संपल्यानंतर आता टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. 6 फेब्रुवारीपासून भारत – वेस्ट इंडिज यांच्यातल्या वन डे मालिकेतील पहिल्याच लढतीत भारतीय संघात ऋषभ पंत (Rishabh Pant) याच्याकडे उपकर्णधारपद सोपवले जाण्याची शक्यता आहे.

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार्‍या या मालिकेसाठी भारतीय खेळाडूंना तीन दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा लागेल. रोहित शर्मा पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. या सामन्यात लोकेश राहुल खेळणार नसल्याचे बीसीसीआयने आधीच स्पष्ट केले होते. त्यात जसप्रीतलाही या मालिकेत विश्रांती दिल्यामुळे पहिल्या वन डेसाठी उपकर्णधार म्हणून ऋषभ पंतचे (Rishabh Pant) नाव आघाडीवर आहे. हा फक्त एका सामन्यापुरता प्रश्न आहे. लोकेश राहुल दुसर्‍या वन डेसाठी संघात परतणार आहे. शिखर धवन आणि ऋषभ पंत हे दोन्ही उपकर्णधारपदासाठी दावेदार आहेत. पण, ऋषभ यष्टिरक्षक आहे आणि डीआरएस किंवा क्षेत्ररक्षणात त्याची फार मदत होऊ शकते. पण संघ व्यवस्थापनाला गरज वाटल्यास उपकर्णधार निवडला जाईल. अन्यथा पहिल्या वन डेत उपकर्णधार हे पद रिक्तच ठेवले जाईल, असे बीसीसीआयच्या अधिकार्‍याने सांगितले.

ऋषभ पंतने (Rishabh Pant) आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद भूषविले आहे आणि भविष्यात टीम इंडियाचा कर्णधार म्हणून ऋषभला तयार करण्याचा विचार सुरू आहे. भविष्याचा विचार करून आतापासून तयारी करायला हवी. ऋषभ पंत चांगला कर्णधार होईल किंवा तो भारताचा कर्णधार बनेल, असा दावा मी करत नाही. पण, तुम्हाला सर्व प्रभावी पर्यायांचा विचार करायला हवा. सध्याच्या घडीला लोकेश राहुल व ऋषभ हे दोन सक्षम पर्याय समोर आहेत, असेही या अधिकार्‍याने सांगितले.

भारताचा वन डे संघ : रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दीपक चहर, शार्दुल ठाकूर, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान.

 

Back to top button