क्रिकेटसाठी बोर्डाची परीक्षा चुकवणार्‍या रवी बिश्नोईला मिळाले कष्टाचे फळ | पुढारी

क्रिकेटसाठी बोर्डाची परीक्षा चुकवणार्‍या रवी बिश्नोईला मिळाले कष्टाचे फळ

मुंबई : ‘कठोर परिश्रम हीच यशाची गुरुकिल्ली आहे,’ असे म्हटले जाते, आणि हेच परिश्रम जेव्हा मनापासून केले जातात तेव्हा यश तुमच्या पायाशी लोळण घेत असते, अशीच काहीशी गत ‘जोधपूर का छोरा’ रवी बिश्नोई याची झाली आहे. क्रिकेटच्या वेडापायी चक्क बोर्डाच्या परीक्षेला दांडी मारणार्‍या रवीला त्याच्या त्यागाचे आणि कष्टाचे फळ मिळाले असून, राष्ट्रीय क्रिकेट संघाचे द्वार त्याच्यासाठी उघडण्यात आले आहे. पुढील महिन्यात होणार्‍या वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन मालिकांसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली आहे.

रवीचा क्रिकेटमधील प्रवास तसा खूप आधीपासून सुरू झाला होता. परंतु; 2015 हे वर्ष त्याच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरले. त्याला व्हायचे होते वेगवान गोलंदाज; परंतु कोच शाहरूख खान पठाण याने त्याला फिरकी गोलंदाज होण्याचा सल्ला दिला. नुसता सल्लाच दिला नाही तर त्याला तसे घडविलेही. त्याची गोलंदाजी पाहून राजस्थान रॉयल्समध्ये त्याला नेट गोलंदाज म्हणून बोलाविण्यात आले. नेटमध्ये त्याच्या गोलंदाजीची चमक अनेक दिग्गजांच्या लक्षात आली. त्याची अंडर-19 वर्ल्डकपसाठी निवड झाली आणि ती त्याने सार्थ करून दाखविली. स्पर्धेत संघाला अंतिम सामन्यात पोहोचविण्यात निर्णायक भूमिका पार पाडली आणि त्याने सर्वाधिक विकेटदेखील मिळविल्या.

आयपीएलमध्ये दाखविली चमक : 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेनंतर माजी कर्णधार आणि लेग स्पिनर अनिल कुंबळेने दोन कोटी रुपयांना बिश्नोईला पंजाब संघात स्थान दिले होते. 2020 मध्ये आपल्या पहिल्या हंगामात बिश्नोईने 12 विकेट मिळवल्या. आता सलग दोन आयपीएल हंगामात बिश्नोईने 23 सामन्यांत 24 विकेट्स मिळविल्या. नवीन हंगामात तो पुन्हा एकदा कर्णधार के. एल. राहुलच्या नेतृत्वाखाली लखनौ संघाकडून खेळेल.

आयपीएल-2021 मध्ये पंजाब सुपर किंग्जचा शेवटचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी होता. या सामन्यात पंजाब संघ पराभूत झाला; पण एका खेळाडूने सर्वांचे लक्ष वेधले. राजस्थानच्या जोधपूरमध्ये राहणारा युवा लेग स्पिनर रवी बिश्नोईने चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला त्रिफळाचित केले. त्याने टाकलेल्या चेंडूवर धोनीचे डोळेही विस्फारले होते.

शेतात खेळता खेळता बनला ‘लेग स्पिनर’

जोधपूरच्या बिरामी गावचे रहिवासी असलेले रवीचे वडील मांगीलाल शिक्षक आहेत, तर आई शिवरी देवी गृहिणी आहे. बिश्नोई दिवसभर क्रिकेट खेळत असे वडील घरी यायची वेळी अभ्यासाला बसायचा. सुरुवातीला तो गावातील शेतात क्रिकेट खेळायचा आणि जोधपूरमध्ये आल्यावर गल्लीत खेळायचा. नंतर त्याने प्रद्धुत सिंह यांच्या स्पोर्टस् अ‍ॅकॅडमीमध्ये प्रवेश घेतला. त्यामुळे त्याचा खेळ सुधारला व तो ‘लेग स्पिनर’ म्हणून नावारूपाला आला.

Back to top button