IPL 2022 : लखनऊ संघाच्या नावाची घोषणा! | पुढारी

IPL 2022 : लखनऊ संघाच्या नावाची घोषणा!

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2022 : लखनऊ फ्रँचायझीने त्याचे अधिकृत नाव जाहीर केले आहे. ही फ्रेंचायझी ‘लखनऊ सुपर जायंट्स’ म्हणून ओळखली जाईल. लखनऊ फ्रँचायझीचे मालक RPSG व्हेंचर्स लिमिटेड (गोएंका ग्रुप) चे अध्यक्ष डॉ. संजीव गोयंका यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे नावाची घोषणा केली.

यापूर्वी 2016 मध्ये गोयंका ग्रुपने पुणे फ्रँचायझीही विकत घेतली होती. त्यावेळी त्यांनी आपल्या संघाचे नाव ‘रायझिंग पुणे सुपर जायंट्स’ असे ठेवले. दोन वर्षांनी म्हणजे 2018 मध्ये, चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सचे आयपीएलमध्ये पुनरागमन झाल्यानंतर पुणे संघाने आयपीएलमधून माघार घेतली. (IPL 2022)

स्पर्धेद्वारे नाव निवडले… (IPL 2022)

लखनऊ फ्रँचायझीने नाव ठरवण्यासाठी सोशल मीडियावर स्पर्धा आयोजित केली होती. त्याचे नाव त्यांनी ‘नाम बनाओ और नाम कमाओ’ असे ठेवले. संजीव गोयंका म्हणाले की, ‘सोशल मीडियाद्वारे घेण्यात आलेल्या स्पर्धेच्या माध्यमातून लाखो संदेश आमच्यापर्यंत पोहोचले आणि त्या आधारावर आम्हाला हे सांगण्यास आनंद होत आहे की आम्ही आमच्या संघाचे नाव लखनऊ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. लखनऊ संघाला असेच प्रेम देत राहा.’


RPSG ग्रुपने 7090 कोटींना संघ विकत घेतला…

यंदाच्या आयपीएलमध्ये आठऐवजी एकूण 10 संघ खेळणार आहेत. बीसीसीआयने गेल्या वर्षी २५ ऑक्टोबरला आयपीएलसाठी दोन नवीन संघांची घोषणा केली होती. लखनऊला RPSG व्हेंचर्स लिमिटेडने 7090 कोटी रुपयांना आणि अहमदाबादला CVC कॅपिटलने 5625 कोटी रुपयांना विकत घेतले. अहमदाबादचे अधिकृत नाव अद्याप जाहीर झालेले नाही.

दोन्ही नवीन संघांनी प्रत्येकी तीन खेळाडूंची निवड केली…

लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नवीन संघांनी देखील आयपीएल 2022 साठी प्रत्येकी तीन खेळाडूंची घोषणा केली आहे. लखनऊ फ्रँचायझीने केएल राहुलची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. फ्रँचायझीने त्याला १७ कोटी रुपयांना करारबद्ध केले आहे. याशिवाय लखनऊने ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मार्कस स्टॉइनिस आणि भारताचा अनकॅप्ड लेगस्पिनर रवी बिश्नोई यांना करारबद्ध केले आहे.

Back to top button