Virat Kohli : विराट कोहलीचा कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा | पुढारी

Virat Kohli : विराट कोहलीचा कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा

पुढारी ऑनलाईन डेस्क

दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेतील पराभवानंतर विराट कोहलीने (virat kohli) कसोटी कर्णधार पद सोडले आहे. कोहलीने ट्विट करून ही माहिती दिली. कोहलीने लिहिले की, ‘7 वर्षे भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद भूषवणे खूप छान होते. मी माझे काम प्रामाणिकपणे केले आणि कोणतीही कसर सोडली नाही’, अशी भावना त्याने आपल्या पत्रात व्यक्त केली आहे.

विराट कोहलीने आपल्या संदेशात म्हटले आहे की, गेली सात वर्षे सातत्याने मेहनत आणि दैनंदिन प्रयत्नांमुळे संघाला योग्य दिशेने नेण्याचा प्रयत्न केला. मी माझे काम प्रामाणिकपणे केले आणि कोणतीही कसर सोडली नाही, पण प्रत्येक प्रवासाचा शेवट असतो, माझ्यासाठी कसोटी कर्णधारपद संपवण्याची हीच योग्य वेळ आहे.

विराट कोहली पुढे म्हणतो की, या प्रवासात अनेक चढ-उतार आले, पण प्रयत्नात कोणीही कसर सोडली नाही. मी नेहमीच माझे १२० टक्के देण्याचा प्रयत्न केला आहे, जर मी काही करू शकत नाही तर मला वाटते की ती गोष्ट माझ्यासाठी योग्य नाही.या निर्णयावर मला पूर्ण खात्री आहे आणि तो आपल्या संघाची फसवणूक करू शकत नाही. या संदेशात विराट कोहलीने बीसीसीआयचे आभार मानले, तसेच रवी शास्त्री आणि उर्वरित सपोर्ट स्टाफचे आभार मानले.

T20 विश्वचषकानंतर कोहलीने (virat kohli) T20 संघाचे कर्णधारपदही सोडले होते. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी बीसीसीआयने कोहलीला वनडे संघाच्या कर्णधारपदावरून हटवले होते. त्याच्या जागी रोहित शर्माला कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली होती.

आता कसोटी संघाच्या कर्णधार पदी कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

2014 मध्ये विराट कोहलीला कसोटीचे कर्णधारपद मिळाले होते. धोनीने कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर कोहलीला कसोटी संघाचा कर्णधार बनवण्यात आले. विराट हा भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे. त्याने 68 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आणि 40 सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून दिला. त्याच्यानंतर महेंद्रसिंग धोनीचा क्रमांक लागतो. धोनीने 60 कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आणि 27 सामने जिंकले.

Back to top button