शेंगदाण्यापासून दूध बनविणे अलीकडे लोक गंभीरतेने घेऊ लागले आहेत. शेंगदाण्याच्या दुधात (peanut milk) लॅक्टोज नसते. त्यामुळे ज्या व्यक्तींना गायी-म्हशीच्या दुधातील लॅक्टोजची अॅलर्जी आहे किंवा ते पचत नसल्यामुळे दूध पिऊ शकत नाहीत, अशा लोकांसाठी शेंगदाण्याचे दूध हा एक उत्तम पर्याय आहे.
आपल्या देशात शेंगदाणे कमालीचे प्रसिद्ध आहेत. आपण शेंगदाणे अनेक प्रकारे खात असतो. शेंगदाणे दिसल्याबरोबर पटकन एक तरी दाणा तोंडात टाकण्याचा मोह सवार्र्ंना होतो. शेंगदाणे खारवून, भाजून, भिजवून, चिक्की करून खाणे लोकांना खूप आवडते. प्रत्येक भाजी, खिचडीत आणि स्वयंपाकाच्या अनेक पाककृतीत शेंगदाण्याचा उपयोग केला जातो. असाच एक वेगळा उपयोग आता हळूहळू लोकमान्य होत आहे. शेंगदाण्यापासून दूध बनविणे अलीकडे लोक गंभीरतेने घेऊ लागले आहेत.
शेंगदाण्याचे दूध बनविण्यासाठी सुरुवातीला उत्तम प्रतीचे शेंगदाणे हलके भाजून घेतात. त्यामुळे शेंगदाण्याची साल काढणे सोपे जाते. अशा साल काढलेल्या शेंगदाण्यांमधून खवट झालेले दाणे काढून टाकावेत, तसेच दाण्यांतील अंकुर चाळणीतून गाळून वेगळे काढावेत. असे शेंगदाणे नंतर बारीक वाटून गुळगुळीत लापशी (पेस्ट) तयार करावी. ब्लेंडरमध्ये शेंगदाण्याच्या वजनाचे सातपट पाणी मिसळावे. या लापशीचा सामू 6.8 होईपर्यंत त्यात कॅल्शियम हायड्रॉक्साईडचे द्रावण मिसळावे. नंतर डायसोडियम फॉस्फेट यांचे मिश्रण तयार करून त्याचा सामू 7 ठेवावा आणि हे दूध टिकविण्यासाठी ते दुधात मिसळावे. नंतर हे दूध स्वच्छ कापडातून गाळून घ्यावे.
दुधाचे पौष्टिक गुणधर्म वाढविण्यासाठी त्यात अ, ड, ब 2, ब 12, फॉलिक अॅसिड ही जीवनसत्त्वे आणि खनिजे (कॅल्शियम व लोह) मिसळावे. याशिवाय दुधाच्या गोडीसाठी 7 टक्के साखर मिसळावी. दूध एकजीव करावे. या प्रक्रियेला होमोजिनायझेशन असे म्हणतात. नंतर हे दूध वाफेवर गरम करून थंड झाल्यावर बाटल्यांमध्ये भरावे आणि बाटल्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवाव्यात. शेंगदाण्याच्या दुधात लॅक्टोज नसते. त्यामुळे ज्या व्यक्तींना गायी-म्हशीच्या दुधातील लॅक्टोजची अॅलर्जी आहे किंवा ते पचत नसल्यामुळे दूध पिऊ शकत नाहीत, अशा लोकांना शेंगदाण्याचे दूध हा एक उत्तम पर्याय आहे.
– अनिल विद्याधर
हेही वाचलतं का?