Corona Update : देशात २४ तासांत २ लाख ६८ हजार नवे रुग्ण, ४०२ जणांचा मृत्यू | पुढारी

Corona Update : देशात २४ तासांत २ लाख ६८ हजार नवे रुग्ण, ४०२ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

Corona Update : देशातील कोरोनाबाधितांचा आलेख सातत्याने उंचावत आहे. याआधीच्या दिवशीच्या तुलनेत गेल्या २४ तासांत कोरोना रुग्णसंख्येत ४,६३१ ने वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात २ लाख ६८ हजार ८३३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, ४०२ जणांचा मृत्यू झाला आहे. २४ तासांत १ लाख २२ हजार ६८४ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट १६.६६ टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, देशात ओमायक्रॉन रुग्णसंख्या ६,०४१ वर पोहोचली आहे. सध्या देशात कोरोनाचे १४ लाख १७ हजार ८२० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

याआधीच्या चोवीस तासांमध्येच दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत ६.७ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली होती. गुरूवारी दिवसभरात २ लाख ६४ हजार २०२ कोरोनाबाधितांची भर पडली होती. तर, ३१५ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला होता. दरम्यान १ लाख ९ हजार ३५४ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली. शुक्रवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९५.२० टक्के होता. बुधवारी दिवसभरात २ लाख ४७ हजार ४१७ कोरोनाबाधित आढळले होते.

मुंबई, दिल्लीसह २० महानगरांत संक्रमण दर २० टक्क्यांहून जास्त

देशात तिसर्‍या लाटेत ज्या वेगाने दैनंदिन रुग्णसंख्या वाढत आहे, त्यापेक्षा रुग्णसंख्या वाढीचा वेग देशातील मुंबई, दिल्लीसह २० महानगरांतून कितीतरी पटींनी जास्त आहे. या महानगरांत २० टक्क्यांहून अधिक संक्रमण दर आहे. या महानगरांत दर १०० चाचण्यांमागे २० जण कोरोना बाधित आढळत आहेत.

देशात दर लाख लोकसंख्येमागे १९ रुग्ण सध्या कोरोनाबाधित आढळत आहेत. दुसरीकडे दिल्लीतील गुरुग्राममध्ये दर लाख लोकसंख्येमागे १७९ रुग्ण आढळत आहेत. कोलकात्यात दर लाख लोकांमागे १५७, बंगळुरूला १६३, दिल्लीत १३९, तर मुंबईत १३२ जण बाधित आढळत आहेत.

महाराष्ट्रात किट विक्रीवर लक्ष ठेवण्याचे आदेश

अनेक लोक रुग्णालयात न जाता घरीच कोरोना किटच्या मदतीने तपासणी करत आहेत. त्यामुळे रुग्णांचा नेमका आकडा मिळत नाही. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आरोग्य विभागाने अशा किटच्या विक्रीवर लक्ष ठेवण्याचे आदेश यंत्रणेला दिले आहेत. मुंबईतील मेडिकल स्टोअर्सवरून असे ३ लाख किट विकले गेल्याचे सांगण्यात येते.

मुंबईत दुसर्‍याही दिवशी रुग्णसंख्येत घट…

सलग दुसर्‍या दिवशीही घट नोंदवत मुंबईत शुक्रवारी ११ हजार ३१७ नवे कोरोना रुग्ण आढळले. शुक्रवारी १४ जानेवारीला ५४ हजार ९२४ चाचण्या करण्यात आल्या. सुमारे १६ हजाराने चाचण्या कमी झाल्यामुळे रुग्णसंख्या घटली असावी. मुंबईत मृत्यूचा आकडा मात्र वाढत असून २४ तासांत ९ जणांचा मृत्यू झाला. त्यात दोघे चाळीशीच्या आतले होते.

खात्री नसलेल्या चाचण्या आणि स्वैर उपचार…

खात्री नसलेल्या चाचण्या आणि स्वैर उपचार ही याआधी भारतात येऊन गेलेल्या कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेची वैशिष्ट्ये तिसर्‍या लाटेतही बघायला मिळत आहेत. देशभरासह परदेशातील मिळून ३५ डॉक्टरांनी ही बाब अधोरेखित करून केंद्रीय तसेच राज्यांच्या आरोग्य विभागाला एक खुले पत्र लिहिले असून, यातून खात्री नसलेल्या या उपचारपद्धती सरसकट अवलंबणे बंद करावे आणि रुग्णाच्या स्थितीनुरूप औषधोपचाराला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले आहे.

मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमधील डॉ. संजय नागराळ यांचीही स्वाक्षरी या पत्रावर आहे. कोरोना उपचार असो, चाचण्या असोत वा रुग्णालयात दाखल करणे असो, आपण सारेच अति करत आहोत. हॉर्वर्ड आणि जॉन हापकिन्समधील भारतीय मूळ असलेले डॉक्टरही पत्रलेखकांमध्ये सहभागी आहेत.

Corona Update : जगभरातील रुग्णसंख्येतही वाढ

जगभरात या आठवड्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. मृत्यू दरही १२ टक्क्यांनी वाढला आहे. कॅनडात शुक्रवारी कोरोनाचे सुमारे २० हजार नवे रुग्ण आढळून आले. यामुळे येथील रुग्णसंख्या २७ लाखांवर पोहोचली आहे. तर आतापर्यंत ३१ हजार ३०६ जणांचा मृत्यू झाला आहे. ऑस्ट्रेलियात ओमायक्रॉनचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आहेत.

Back to top button