Dapoli : दापोलीत तीन वृद्ध महिलांचा जळून मृत्यू, तीन खोल्यांमध्ये सापडले तिघींचे मृतदेह, घातपाताचा संशय व्यक्त

जालगाव; पुढारी वृत्तसेवा : दापोली तालुक्यातील वणोशी खोतवाडी येथे एकाच घरातील तीन वृद्ध महिलांचा जळून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेने अवघा दापोली तालुका हादरून गेला असून, घातपाताचा संशय व्यक्त केला जात असून दापोली पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. (Dapoli)
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार दापोली पालगड रोडवरील वणौशी या गावांमध्ये खोतवाडी आहे. या वाडीमध्ये सुमारे 25 घरे आहेत. यातील बहुतांशी घरे ही बंद अवस्थेत आहेत.
Dapoli : गावात केवळ चार ते पाच कुटुंबेच
वाडीतील बहुतांश ग्रामस्थ हे काम-धंद्यानिमित्त मुंबई येथे स्थलांतरित झालेले आहेत. सद्यस्थितीत गावात केवळ चार ते पाच कुटुंबेच वास्तव्याला आहेत. गावातच खोतवाडी येथे एका घरामध्ये सत्यवती पाटणे (वय 75) तसेच पार्वती पाटणे (90) या वृद्ध महिला राहत होत्या. त्यांच्या समोरच्या घरात त्यांच्याच नातेवाईक असलेल्या इंदुबाई पाटणे (85) या राहायला होत्या.
सध्या दापोलीत थंडीचे दिवस असल्याने त्या घरांची दारे-खिडक्या बंद करून राहत असत. मात्र, दररोज सकाळी त्या उन्हामध्ये बसत असत. त्यांच्या घरासमोरील मंदिरात पूजा करण्याकरिता विनायक पाटणे हे दररोज सकाळी येतात. त्यांना शुक्रवारी सकाळी या महिला नेहमीप्रमाणे बाहेर उन्हामध्ये बसलेल्या दिसल्या नाहीत.
शिवाय त्यांना मंदिराची किल्ली देखील हवी होती. यासाठी ते किल्ली मागण्यांकरिता या महिलांच्या घरामध्ये गेले. मात्र, आतून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी घराच्या मागील बाजूचा दरवाजा ढकलून पाहिला असता तो त्यांना उघडा असलेला आढळला. त्यांनी आतमध्ये पाहिले असता त्यांना या वृद्ध महिला मृतावस्थेत आढळून आल्या.
भारतात चाचण्याही उगीचच अन् उपचाराचाही ‘ओव्हरडोस’ https://t.co/DTFzEvYCeC
— Pudhari (@pudharionline) January 15, 2022
Dapoli : घरामध्ये तीन खोल्यांमध्ये तीन महिला मृतावस्थेत आढळल्या
दरम्यान, विनायक पाटणे ही बाब ग्रामस्थांना सांगितली ग्रामस्थांना सांगितल्यावर ग्रामस्थांनी येऊन खातरजमा केली असता घरामध्ये तीन खोल्यांमध्ये तीन महिला मृतावस्थेत आढळून आल्या.
ग्रामस्थांनी या घटनेची माहिती तत्काळ या महिलांच्या मुंबईतील नातेवाईकांना दिली. हे नातेवाईक शुक्रवारी सायंकाळी मुंबई दापोली येथे येऊन दाखल झाले. माहिती मिळताच दापोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे हेही आपल्या अधिकार्यांसमवेत शुक्रवारी सायंकाळी घटनास्थळी दाखल झाले . शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद करण्याचे काम पोलिस स्थानकात सुरू होते.
या घटनेतील पार्वती पाटणे या अनेक वर्ष जागेवरच असल्याने त्या दुसर्या खोलीमध्ये जळालेल्या अवस्थेमध्ये आढळून आल्या. इंदुबाई पाटणे या त्यांच्या समोरच्या घरात राहणार्या त्यांच्या दुसर्या नातेवाईक होत्या.
त्या या दोन महिलाही घरातील हॉलमध्ये मृतावस्थेत आढळून आल्या. शिवाय या घराचा दरवाजा आतल्या बाजूने बंद होता. यामुळे संशय व्यक्त करण्यात येत आहे. दापोली पोलिस या घटनेचा कसून तपास करत आहेत.
घटनास्थळी रक्ताचा सडा
या महिला ज्या घरांमध्ये मृतावस्थेत आढळून आल्या, त्या घराचा पुढील दरवाजा का बंद होता व मागील दरवाजा उघडा होता. घटनास्थळाची पाहणी केली असता घरात सत्यवती पाटणे या पडवीमध्ये चुलीजवळ मृतावस्थेत जळालेल्या अवस्थेत आढळून आल्या.
त्यांचे डोके फुटून त्यातून बराच रक्तस्त्राव झाल्याचे दिसून येत होते. घटनास्थळी रक्ताचा सडा आढळून आला. या तिहेरी मृत्यू प्रकरणाला घातपाचा वास येत असल्याने पोलिस त्या द़ृष्टीने तपास करीत आहेत.