IPL ‘स्पॉन्सरशिप’मुळे BCCI ला मिळणार मोठा खजिना! | पुढारी

IPL ‘स्पॉन्सरशिप’मुळे BCCI ला मिळणार मोठा खजिना!

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक कंपन्यांपैकी एक असलेल्या टाटा समूहाने इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये धमाकेदार एंट्री केली आहे. चिनी मोबाईल कंपनी विवोची सुट्टी करत टाटा समूह आयपीएलचा नवा टायटल स्पॉन्सर बनला आहे. टाटा समूहाच्या प्रवेशाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) देखील श्रीमंत झाले आहे. टाटा समूहाने आयपीएलशी टायटल स्पॉन्सर म्हणून दोन वर्षांचा करार केला आहे.

अहवालानुसार, बीसीसीआयला (BCCI) टाटासोबतच्या करारातून १३० कोटी रुपयांपेक्षा जास्त नफा मिळण्याची अपेक्षा आहे. आयपीएलच्या नवीन हंगामात दोन नवीन संघांच्या आगमनाने, बीसीसीआयला २०२३ पर्यंत विवोकडून ९९६ कोटी रुपयांचा नफा होण्याची अपेक्षा होती. विवोने २०२२ आणि २०२३ या दोन सीझनसाठी ४४० कोटी रुपयांऐवजी अनुक्रमे ४८४ कोटी आणि ५१२ कोटी रुपयांची ऑफर दिली होती.

टाटाच्या दृष्टीने, त्यांनी बीसीसीआयला (BCCI) प्रति हंगाम ३३५ कोटी रुपये देणे अपेक्षित आहे. तर करारातून बाहेर पडण्याची रक्कम म्हणून वीवो बीसीसीआयला ४५० कोटी रुपये देणार आहे. वरील सर्व व्यवहारांमुळे बीसीसीआयला पुढील दोन हंगामात ११२४ कोटींचा नफा होईल.

दुसरीकडे, काही अहवालांवर विश्वास ठेवला तर, टाटा आयपीएल प्रायोजकत्व अधिकारांसाठी बीसीसीआयसोबतचा पाच वर्षांचा करार वाढवू इच्छित होता. तथापि, बीसीसीआय २०२४-२८ हंगामासाठी नवीन निविदा मागवणार आहे. यासाठी जास्त बोली लावून जास्त रक्कम मोजावी लागेल.

आता नजर आयपीएलच्या लिलावावर… (BCCI)

प्रायोजकांच्या घोषणेसह, आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या अध्यक्षांनी देखील पुष्टी केली की मेगा लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बंगळूरमध्ये होईल. मात्र, दोन नवीन संघांना खेळाडूंना करारबद्ध करण्यासाठी किती वेळ दिला जाईल, हे बीसीसीआयने (BCCI) ठरवलेले नाही. त्यांना किमान काही आठवड्यांचा वेळ दिला जाईल आणि एक-दोन दिवसांत लखनौ आणि अहमदाबाद फ्रँचायझींना औपचारिक पत्र जारी करण्याची अपेक्षा आहे.

Back to top button