Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेच्या ‘डच्चू’वरून फलंदाजी प्रशिक्षकांचा मोठा खुलासा, म्हणाले... | पुढारी

Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेच्या ‘डच्चू’वरून फलंदाजी प्रशिक्षकांचा मोठा खुलासा, म्हणाले...

पुढारी ऑनलाईन डेस्क : केपटाऊन कसोटीच्या पहिल्या डावात अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) पुन्हा एकदा उपयशी ठरला. टीम इंडियाची धावसंख्या ३ बाद ९५ असताना रहाणे मैदानात उतरला. त्याच्या सोबतीला कर्णधार विराट कोहली क्रिजवर होता. पण अवघ्या ९ धावा करून तो पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यामुळे त्याच्या प्लेईंग ११ मधील स्थानाबाबत पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. नेटकरी तर संतापले असून केपटाऊन कसोटीत रहाणेला संधी का दिली? असा सवाल सोशल मीडियातून करत आहेत. तर अनेकजण हनुमा विहारीची बाजू घेत टीम इंडियाच्या व्यवस्थापनावर राग व्यक्त करत असल्याचे दिसत आहे. हनुमा फलंदाजीत चांगले प्रदर्शन करत असताना रहाणेलाच पुन्हा संधी का दिली, अशी विचारणा करत आहेत.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) लवकर बाद झाला. रहाणेने दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले होते. त्यामुळे त्याला केपटाऊन कसोटीत हनुमा विहारीपेक्षा प्राधान्य देण्यात आले, पण त्याने निराशा केली. कागिसो रबाडाने फेकलेल्या जाळ्यात रहाणे अलगत अडकला. रहाणे केवळ ९ धावांचे योगदान देऊ शकला. रहाणेवर चौफेर टीका होत असतानाच टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोर (vikram rathour) यांनी मोठा खुलासा केला आहे. रहाणेला संघातून डच्चू दिला जाऊ शकतो असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत.

पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकार परिषदेत राठोड यांनी रहाणेला आणखी एक संधी दिली जाईल, पण त्यातही तो अपयशी ठरला तर त्याच्या पुढच्या वेळेस दुसऱ्याला संधी देण्यात येईल, असे सांगितले.

राठोड (vikram rathour) पुढे म्हणाले, ‘अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत आहे, तो नेट प्रॅक्टीस आणि प्रत्यक्ष सामन्यामध्ये फलंदाजी करताना खरोखरच चांगला खेळतो. या मालिकेतही त्याने काही उपयुक्त खेळी खेळल्या आहेत. आम्ही त्याला आणखी एक संधी देऊ. त्यानंतर मात्र रहाणेच्या जगेसाठी पात्र असलेल्या दुसऱ्या फलंदाजाचा विचार करू, असे सांगितले.

या मालिकेत रहाणेच्या (Ajinkya Rahane) नावावर दोन चांगल्या खेळींची नोंद झाली. पहिल्या कसोटीत त्याने ४८ धावा केल्या आणि दुसऱ्या कसोटीत ५८ धावा केल्या. पण त्याच्या उंचीच्या फलंदाजाकडून अशा चांगल्या सुरुवातीचे मोठ्या डावात रूपांतर करणे अपेक्षित असते. राठोड यांनीही याबाबत त्यांचे मत व्यक्त केले. ते म्हणाले की, ‘रहाणेला फक्त चांगल्या सुरुवातीचे मोठ्या डावात रूपांतर करण्याची गरज आहे आणि त्यासाठीच तो सतत प्रयत्नशील असतो.’

फलंदाजी प्रशिक्षक राठोड (vikram rathour)  यांना रहाणेकडून पुढील डावात चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा आहे. पण संधींचा विचार करता संघ व्यवस्थापन रहाणेसारख्या खेळाडूला ‘आणखी एक संधी’ देण्यास उत्सुक आहे. ते म्हणाले की, ‘संघ व्यवस्थापन म्हणून आम्हाला फक्त त्याच्याकडून कोणत्याही एका डावात चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा आहे.’


 

Back to top button