

प्रशांत मैड
शिक्रापूर : निष्पाप जीवांचा बळी का घेतला? चिमुकल्यांचा सांभाळ आम्ही केला असता, असा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश व यावर उत्तर नसणारी भयाण शांतता पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथे होती. अलिबाग येथे निर्दयपणे हत्या झालेल्या दोन मुलांची व आत्महत्या केलेल्या आईच्या माहेरघरी मृतदेह येण्याची वाट पहात असलेल्या नातेवाईकांचा हा आक्रोश होता. भौतिक सुखासाठी चिमुकल्यांना ठार मारणाऱ्या कुणाल गायकवाड व प्रियंका इंगळे यांच्याबाबत परिसरात संतप्त भावना व्यक्त होत होती.
अलिबाग (जि. रायगड) येथील एका पर्यटन कॉटेजमध्ये कुणाल चिंतामनी गायकवाड (रा. जातेगाव बुद्रुक) व प्रियंका संदीप इंगळे (रा. मलठण फाटा, शिक्रापूर) या दोघांनी पाच वर्षाची मुलगी भक्ती व तीन वर्षाचा मुलगा माऊली यांना ठार मारून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी (दि. 17) उघड झाला. यामध्ये कुणाल व प्रियंका हे दोघेही पती-पत्नी नाहीत. यामुळे विवाहबाह्य संबंधातुन हा प्रकार घडल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे.
प्रियंका इंगळे हिचा पती संदीप इंगळे हा महावितरणमध्ये कामाला आहे. ते शिक्रापूर येथे वास्तव्यास होते. प्रियंकाचे माहेर पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील आहे व येथेच त्यांच्यावर अंतिम संस्कार होणार आहे. आत्महत्या केलेला कुणाल गायकवाड हा जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) येथे राहण्यास असून तो महावितरणमध्ये मदतनीस म्हणून काम करत होता. मयत प्रियंकाचा पती संदीप यांस कुणाल गायकवाड हा कामात मदत करण्यासाठी रात्री-अपरात्री यायचा. परंतु त्यांच्या संबंधांविषयी कुणालाही माहिती नव्हती, असे प्रियंकाच्या नातेवाईकांनी सांगितले.
दि. 2 मे रोजी हे दोघेही शिक्रापूरातून बेपत्ता झाले होते. प्रियंका व मुले बेपत्ता झाल्याची तक्रार पती संदीप यांनी तर कुणाल गायकवाड बेपत्ता झाल्याची तक्रार त्याची पत्नी सपना हिने शिक्रापूर पोलिसांत दिली होती. हे दोघे एकत्रच पळून गेल्याचा संशय प्रियांकाचा पती संदीप याने पोलिसांकडे व्यक्त केला होता.
दोघांची कुटुंब त्यांचा स्वतंत्र शोध घेत होते. प्रियंकाचा नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार दि. ४ रोजी ते वाबळेवाडी येथे असल्याबाबत मोबाईलवर ट्रॅक झाले होते. यानंतर ते कोरेगाव भीमा परिसरात होते. परंतु पोलिसांनी दखल घेतली नाही.
कुणाच्याही बाबत प्रकार घडू नये
11 मे पासून ते अलिबागला असल्याची शक्यता व्यक्त करताना नातेवाईकांनी सांगितले की, प्रियांकाला फोन करत होतो. परंतु एका रिंगमध्ये तो फोन कट होत होता. मुलगी भक्ती हुशार होती, तिच्याशी संपर्क झाला असता तर तिने नक्कीच पत्ता व प्रसंग सांगितला असता. त्यानंतर या दोन मुलांना वाचवू शकलो असतो, अशी हताश प्रतिक्रिया व्यक्त करताना असा प्रकार कुणाच्याही बाबतीत बाबतीत घडू नये असे नातेवाईकांनी सांगितले.
हेही वाचा: