

पुढारी ऑनलाईन डेस्क : दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील एकदिवसीय मालिका (SA vs IND) संपली आहे. यजमानांनी कसोटी मालिकेपाठोपाठ एकदिवसीय मालिकेवरही कब्जा केला आहे. दक्षिण आफ्रिकेने तीन वनडे सामन्यांची मालिका जिंकत टीम इंडियाचा व्हाईट वॉश केला. यजमानांनी शेवटचा सामना ४ धावांनी जिंकला. या सामन्यात एक वेळ अशी होती की, विराट कोहली टीम इंडियाला विजयाकडे खेचून नेत होता, पण द. आफ्रिकेचा डावखुरा फिरकी गोलंदाज केशव महाराजने (keshav maharaj) त्याची महत्त्वाची विकेट घेत सामन्याचा रंगच पालटला. याच केशव महाराज याने आपल्या इन्स्टा पोस्टने भारतीय प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
सामना संपल्यानंतर सर्व खेळाडू मालिका विजयाचे फोटो आणि पोस्ट अपलोड करत होते. अशा स्थितीत केशव महाराज (keshav maharaj) यानेही वनडे मालिका जिंकल्यानंतर इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट केला. आणि त्याने लिहिले की, 'ही वनडे मालिका द. आफ्रिका संघासाठी एक उत्तम मालिका होती. मला या संघाचा अभिमान आहे. आता पुन्हा एकत्र येण्याची आणि पुढील आव्हान स्वीकारण्याची वेळ आली आहे. जय श्री राम!'
केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणा-या टीम इंडियाला वनडे मालिकेतील एकही सामना जिंकता आला नाही. त्यामुळे भारतीय प्रेक्षक निराश झाले आहेत. पण दुसरीकडे द. आफ्रिकेचा गोलंदाज केशव महाराज (keshav maharaj) याच्या इन्स्टा पोस्टमध्ये त्याने शेवटी लिहिलेले 'जय श्री राम' पाहून त्यांना खूप आनंद झाला आहे.
केशव महाराज (keshav maharaj) हा भारतीय वंशाचा द. आफ्रिकन क्रिकेटपटू आहे. या मालिकेत त्याने उत्तम कामगिरी केली. त्याने तीनही सामन्यांमध्ये १-१-१ असे एकूण तीन बळी घेतले. त्याने विराट कोहलीला शेवटच्या दोन सामन्यांमध्ये बाद केले. दुस-या वनडे सामन्यात त्याने विराटला शून्यावर आणि शेवटच्या तिस-या सामन्यात ६५ धावांवर बाद केले. याशिवाय पहिल्या वनडे सामन्यात शिखर धवनची मोठी विकेट त्याने आपल्या नावावर केली आणि सामन्याला कलाटणी दिली.
दरम्यान, शेवटच्या वनडे सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर २८८ धावांचे लक्ष्य ठेवले. त्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने ४९.२ षटकांत २८३ धावा केल्या. त्यामुळे संघाला ४ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. विराट कोहलीसह दीपक चहरने भारतासाठी दमदार अर्धशतक झळकावण्याचा प्रयत्न केला पण तो पुरेसा सिद्ध झाला नाही.