

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री प्रिया मराठे हिला (Priya Marathe) आजवर आपण अनेक हिंदी-मराठी मालिकांमधून भेटत आलोय. तिने साकारलेल्या खलनायकी व्यक्तिररेखांची छाप आजही प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. प्रिया मराठे हिला (Priya Marathe) खलनायकी व्यक्तिरेखा साकारणं आव्हानात्मक वाटतं. प्रेक्षकांना ज्या व्यक्तिरेखांचा राग येतो त्या साकारताना एक अभिनेत्री म्हणून कस लागतो असं तिला वाटतं. आता प्रिया पुन्हा छोट्या पडद्यावर दिसणार आहे.
'या सुखांनो या', 'चार दिवस सासूचे', 'तू तिथे मी' या मराठी, तर 'बडे अच्छे लगते हैं', 'पवित्र रिश्ता', 'कॉमेडी सर्कस' या हिंदी मालिकांमध्येही तिने भूमिका साकारल्या आहेत. 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता शंतनू मोघेशी तिने लग्न केले. सुरुवातीला शंतनू आणि तिच्यात मैत्री झाली. नंतर २०१२ मध्ये दोघांनी लग्न केले. प्रियाचा स्वत:चा एक कॅफेदेखील आहे.
आता प्रिया तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत दिसणार असून ती यामध्ये मोनिका ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. या भूमिकेविषयी प्रिया म्हणाली, 'मी याआधी जयोस्तुते आणि शतदा प्रेम करावे या मालिका केल्या आहेत. तुझेच मी गीत गात आहे मालिकेच्या निमित्ताने पुन्हा मी छोट्या पडद्यावर येईन. या मालिकेतही हटके लूक मध्ये दिसेन. पिहू नावाच्या चिमुरडीसोबत माझे बरेचसे सीन आहेत.
बालकलाकारांसोबत काम करताना नेहमीच मजा येते. त्यांच्या कलाने आणि त्यांचे मूड सांभाळत काम करावं लागतं. आताची पीढी प्रचंड हुशार आहे. मालिकेतली चिमुकली स्वरा आणि पिहू दोघीही कमाल आहेत. आमची एकमेकांशी छान गट्टी जमली आहे. ही गोष्ट मुलगी आणि तिच्या बाबांच्या प्रेमावर आधारलेली आहे. बाप-लेकीच्या नात्यात माझी म्हणजेच मोनिका या पात्राची विशेष भूमिका आहे.