घरोघरी मातीच्या चुली आणि साधी माणसं नंतर सुरु होतेय नवी मालिका येड लागलं प्रेमाचं

नवी मालिका येड लागलं प्रेमाचं
नवी मालिका येड लागलं प्रेमाचं

पुढारी ऑनलाईन डेस्क : घरोघरी मातीच्या चुली आणि साधी माणसं नंतर स्टार प्रवाहवर सुरु होतेय नवी मालिका येड लागलं प्रेमाचं. विठुरायाच्या पंढरपुर नगरीत या मालिकेची गोष्ट घडणार आहे. राया आणि मंजिरी या मालिकेतली प्रमुख पात्र. एकमेकांचा तिरस्कार करणाऱ्या राया आणि मंजिरीचा प्रेमात पडण्यापर्यंतचा प्रवास म्हणजे येड लागलं प्रेमाचं ही मालिका. दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता विशाल निकम आणि स्वाभिमान मालिकेतील प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री पुजा बिरारी या मालिकेत राया आणि मंजिरीची भूमिका साकारताना दिसतील.

अभिनेता विशाल निकम म्हणाला, 'मी आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळं आणि हटके असं हे पात्र आहे. खऱ्या आयुष्यातही माझं आणि विठुरायाचं खास नातं आहे. माऊलींच्या आशीर्वादामुळेच इथवरचा प्रवास मी करु शकलो. माझ्या घरी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. या मालिकेची गोष्टदेखील पंढरपुरात घडते. त्यामुळे मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो. पुजा बिरारीसोबत मी पहिल्यांदा काम करतो आहे. पुजा खूप समजूतदार आहे. ती स्वत:पेक्षा दुसऱ्याचा जास्त विचार करते. माणूस म्हणून ही सर्वात मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. पुजाच्या याच स्वभावामुळे आमचे सीन्स खूप छान होत आहेत अशी भावना विशाल निकम याने व्यक्त केली.'

एका छोट्या ब्रेकनंतर पुजा बिरारी देखील मंजिरी हे पात्र साकारण्यासाठी फारच उत्सुक आहे. मंजिरी या नावातच गोडवा आहे. हाच गोडवा या पात्रात देखील आहे. विठुराया तिच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. 'शूटिंगच्या निमित्ताने मी पहिल्यांदाच पंढरपुरात गेले. पण पहिल्यांदा गेलेय असं जाणवलं नाही. पंढरपुराने मला आपलसं केलं आहे असं मला वाटत होतं. पंढरपुरातल्या प्रत्येक गोष्टीत विठुरायाचा वास आहे. शूटिंगच्या निमित्ताने ही गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली. याआधीच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं आहे. हेच प्रेम यापुढेही मिळेल याची मला खात्री आहे अशी भावना पुजा बिरारीने व्यक्त केली.'विशाल निकम आणि पूजा बिरारीसोबतच मालिकेतून अनेक दिग्गज कलाकार भेटीला येतील. नवी मालिका येड लागलं प्रेमाचं स्टार प्रवाहवर लवकरचं येणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news