

Main Wapas Aaunga OTT Release: दिग्दर्शक इम्तियाज अली यांचा बहुचर्चित चित्रपट 'मैं वापस आऊंगा' थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. भावनिक कथा, दमदार अभिनय आणि हृदयस्पर्शी संगीतामुळे या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली. आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला असून, ज्यांना थिएटरमध्ये हा चित्रपट पाहता आला नाही त्यांच्यासाठी आता आनंदाची बातमी आहे.
'मैं वापस आऊंगा' हा चित्रपट 7 ऑगस्टपासून नेटफ्लिक्सवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना घरबसल्या हा चित्रपट पाहता येणार आहे.
चित्रपटात दिलजीत दोसांझ, वेदांग रैना, शर्वरी वाघ आणि नसीरुद्दीन शाह यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कलाकारांच्या प्रभावी अभिनयामुळे चित्रपटाला थिएटरमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला होता.
हा चित्रपट 12 जून रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. प्रदर्शनानंतर सोशल मीडियावर अनेक प्रेक्षकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. चित्रपटातील भावनिक प्रसंग, कथा आणि संगीतामुळे अनेक प्रेक्षक भावूक झाल्याचेही पाहायला मिळाले.
बॉक्स ऑफिसवरही चित्रपटाने समाधानकारक कामगिरी केली असून, इम्तियाज अली यांच्या आणखी एका संवेदनशील प्रेमकथेची चर्चा रंगली.
चित्रपटाची कथा भारताच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. फाळणीमुळे एकमेकांपासून दूर झालेल्या दोन प्रेमिकांची ही भावनिक कहाणी आहे. अनेक वर्षांपूर्वी अपूर्ण राहिलेलं प्रेम आणि दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी एक नातू आपल्या आजोबांना पुन्हा सीमापार घेऊन जातो.
या प्रवासात भूतकाळातील आठवणी, प्रेम, विरह आणि नात्यांमधील भावनिक संघर्ष उलगडत जातो. चित्रपटात दिलजीत दोसांझ यांनी नातवाची भूमिका साकारली असून, नसीरुद्दीन शाह आजोबांच्या भूमिकेत दिसतात. तर वेदांग रैना यांनी तरुण वयातील पात्र साकारले असून शर्वरी वाघ त्यांच्या प्रेयसीच्या भूमिकेत झळकली आहे.
इम्तियाज अली यांच्या चित्रपटांमध्ये प्रेमकथा नेहमीच वेगळ्या पद्धतीने मांडल्या जातात. 'मैं वापस आऊंगा'मध्येही प्रेम, विरह, आठवणी आणि नात्यांची भावनिक गुंतागुंत प्रभावीपणे दाखवण्यात आली आहे. चित्रपटातील गाण्यांनाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला असून, संगीत हा या चित्रपटाचा आणखी एक मजबूत पैलू आहे.
इम्तियाज अली यांनी यापूर्वी 'रॉकस्टार', 'लव्ह आज कल', 'तमाशा' यांसारख्या चित्रपटांमधून प्रेम, आयुष्य आणि नातेसंबंध यांचा वेगळ्या शैलीत वेध घेतला आहे. त्यांच्या चित्रपटांमध्ये केवळ प्रेमकथा नसते, तर आयुष्याकडे नव्या नजरेने पाहण्याचा दृष्टिकोनही असतो. आता 'मैं वापस आऊंगा' ओटीटीवर येत असल्याने हा भावनिक चित्रपट अधिक मोठ्या प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.