E20 Janta Party: E20 जनता पार्टी कोणी स्थापन केली? सोशल मीडियावर युजर्सने घातला धुमाकूळ, काही तासांत लाखो फॉलोअर्स वाढले

E20 Janta Party: या मोहिमेचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचा दावा करण्यात आला असून ग्राहकांना इंधन निवडीचे स्वातंत्र्य मिळावे, अशी प्रमुख मागणी आहे.
E20 Janta Party
E20 Janta PartyPudhari
Published on
Updated on

E20 Janta Party: शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर कॉकरोच जनता पार्टीने (CJP) आपले आंदोलन मागे घेतले असले, तरी आता सोशल मीडियावर 'E20 जनता पार्टी' या नव्या डिजिटल मोहिमेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. हा कोणताही नोंदणीकृत राजकीय पक्ष किंवा संघटना नसून, E20 पेट्रोलविरोधात सुरू करण्यात आलेले सोशल मीडिया अभियान असल्याचा दावा संबंधित हँडलकडून करण्यात आला आहे.

अल्पावधीतच या मोहिमेला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळत असून हजारो नवे फॉलोअर्स जोडले जात आहेत. या मोहिमेचा मुख्य मुद्दा म्हणजे E20 पेट्रोलसोबतच 100 टक्के इथेनॉलमुक्त (Pure Petrol) पेट्रोलचा पर्याय ग्राहकांना उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

काय आहे E20 जनता पार्टी?

'E20 जनता पार्टी' हा कोणताही अधिकृत राजकीय पक्ष किंवा नोंदणीकृत संस्था नाही. 'X' (पूर्वीचे ट्विटर) आणि इन्स्टाग्रामवर सुरू करण्यात आलेले हे एक डिजिटल अभियान आहे. या अभियानाशी संबंधित हँडल स्वतःला सर्वसामान्य वाहनचालकांचा आवाज असल्याचे सांगत आहे.

या मोहिमेच्या समर्थकांचे म्हणणे आहे की, सरकारने E20 पेट्रोल उपलब्ध करून द्यावे, याला त्यांचा विरोध नाही. मात्र, ग्राहकांना 100 टक्के शुद्ध, इथेनॉलमुक्त पेट्रोल खरेदी करण्याचाही पर्याय उपलब्ध असावा, जेणेकरून प्रत्येक जण आपल्या वाहनासाठी योग्य इंधनाची निवड स्वतः करू शकेल.

सोशल मीडियावर काय मागणी केली जात आहे?

या मोहिमेशी संबंधित पोस्टमध्ये म्हटले आहे की, "आमची वाहने ही प्रयोगशाळेतील टेस्ट मशीन नाहीत. आम्ही ती आमच्या मेहनतीच्या पैशातून विकत घेतली आहेत आणि त्यावर आधीच करही भरला आहे."

तसेच भारत हा मोठ्या प्रमाणावर मध्यमवर्गीयांचा देश असल्याने वाहन हे केवळ हौसेचे साधन नसून अनेकांसाठी रोजगार आणि दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग असल्याचेही या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.

E20 Janta Party
Pralhad Joshi | प्रल्हाद जोशी यांनी शिक्षण मंत्रालयाचा पदभार स्वीकारला

E20 जनता पार्टीच्या प्रमुख मागण्या

या डिजिटल मोहिमेची मुख्य मागणी म्हणजे देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर E20 पेट्रोलसोबतच 100 टक्के इथेनॉलमुक्त पेट्रोलही उपलब्ध करून द्यावे.

याशिवाय मोहिमेत पुढील मुद्दे मांडण्यात आले आहेत:

  • वाहन उत्पादकांनी शिफारस केलेल्या इंधनाचा पर्याय उपलब्ध करून द्यावा.

  • ग्राहकांवर कोणतेही इंधन सक्तीने लादू नये.

  • वाहनमालकांना त्यांच्या पसंतीचे इंधन निवडण्याचे स्वातंत्र्य मिळावे.

  • ग्राहकांच्या हिताला प्राधान्य देत इंधन धोरणात पारदर्शकता असावी.

राजकीय पक्षाशी संबंध असल्याचा दावा फेटाळला

'E20 जनता पार्टी'च्या सोशल मीडिया हँडलवरील पोस्टनुसार, ही स्वतंत्र नागरिकांची मोहीम (Independent Citizen Campaign) आहे. या मोहिमेचा उद्देश इंधन धोरणाशी संबंधित ग्राहकांच्या प्रश्नांवर चर्चा घडवून आणणे, पारदर्शकता वाढवणे आणि ग्राहकांच्या अधिकारांचे संरक्षण करणे, हा आहे. तसेच कोणत्याही राजकीय पक्षाशी किंवा विचारसरणीशी या मोहिमेचा संबंध नसल्याचा दावाही करण्यात आला आहे.

E20 Janta Party
DoT Telecom Rules: सरकारचा मोठा निर्णय! आता तुमच्या कॉल-मेसेजचा डेटा भारताबाहेर जाणार नाही; DoT चे नवे नियम लागू

कॉकरोच जनता पार्टीशी तुलना

सोशल मीडियावर अनेकजण या मोहिमेची तुलना कॉकरोच जनता पार्टी (CJP) शी करत आहेत. कारण CJP ची सुरुवातही सोशल मीडियावरील व्यंगात्मक (Satirical) मोहिम म्हणून झाली होती. त्यानंतर NEET पेपर लीक प्रकरणात ती मोठ्या आंदोलनात परिवर्तित झाली होती.

मात्र, E20 जनता पार्टी आणि CJP यांच्यात अधिकृत संबंध असल्याची कोणतीही माहिती उपलब्ध नाही. दोन्ही मोहिमांची तुलना प्रामुख्याने सोशल मीडियावरील चर्चांच्या आधारावर केली जात आहे.

सोशल मीडियावर जोरदार प्रतिसाद

या डिजिटल मोहिमेला अल्पावधीत मोठा प्रतिसाद मिळत आहे. उपलब्ध माहितीनुसार, 'X' वरील या हँडलचे फॉलोअर्स एका दिवसात सुमारे 45 हजारांहून अधिक झाले आहेत. तर इन्स्टाग्रामवरही फॉलोअर्सची संख्या सुमारे 8,800 वरून 1.44 लाखांपर्यंत पोहोचली आहे.

पुढे काय?

सध्या 'E20 जनता पार्टी' ही केवळ सोशल मीडियावर चालणारी डिजिटल मोहीम आहे. ती कोणतीही नोंदणीकृत राजकीय संघटना नसल्याचा दावा संबंधित हँडलकडून करण्यात आला आहे.

या मोहिमेची मुख्य मागणी म्हणजे E20 पेट्रोलसोबत 100 टक्के शुद्ध, इथेनॉलमुक्त पेट्रोलचा पर्याय उपलब्ध करून देणे. या मागणीबाबत सरकार पुढे कोणती भूमिका घेते आणि या अभियानाला किती व्यापक लोकसमर्थन मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news