

मुंबई - चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांचा द बंगाल फाईल्स आज ५ सप्टेंबर, २०२५ रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला. दरम्यान, निर्मात्याला राजकीय दबाव आणि चित्रपट विरोधाला सामोरे जावे लागले आहे. पश्चिम बंगालमध्ये अनेक थिएटर मालकांनी कथितपणे सांगितले आहे की, राज्य सरकार आणि पोलिसांकडून चित्रपट न दाखवण्याचे दबाव मिळत आहे.
'द बंगाल फाईल्स' हा चित्रपट विवेक रंजन अग्निहोत्री यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे. तर अभिषेक अग्रवाल, पल्लवी जोशी यांची निर्मिती आहे. यात मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, अनुपम खेर आणि दर्शन कुमार यांच्या भूमिका आहेत. विवेक अग्निहोत्री यांचा हा चित्रपट ’द फाइल्स ट्रिलॉजी’ मधील तिसरा भाग आहे, ज्यामध्ये Tashkent Files (२०१९) आणि Kashmir Files (२०२२) हे आधीचे भाग होते.
विवेक अग्निहोत्री यांनी या घटनेचा तात्काळ निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी पुढील परिस्थितीनुसार याचिका (writ petition) दाखल करण्याचा विचार केला आहे.
चित्रपटाच्या सिनेमागृहातील रिलीजनंतर त्याच्या ओटीटी रिलीजची तयारी देखील सुरू आहे. ZEE5 या प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट रिलीज होईल, असे म्हटले जात आहे. पण तारीख अद्याप घोषित केलेली नाही.
पश्चिम बंगालमध्ये 'द बंगाल फाइल्स' प्रदर्शित करण्यासाठी निर्माती-अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी राष्ट्रपतींना खुले पत्र लिहिले आहे. पल्लवी जोशी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना उद्देशून लिहिलेली एक पत्र शेअर केली.
त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले- ''द बंगाल फाईल्सची निर्माती म्हणून, मला दुःख आहे की बंगालमधील मल्टिप्लेक्स साखळीने राजकीय दबाव आणि सत्ताधारी पक्षाच्या धमक्यांमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनास नकार दिला आहे. माझे संवैधानिक अधिकार राखण्यासाठी आणि बंगालमध्ये त्याचे प्रदर्शन सुनिश्चित करण्यासाठी मी तुमच्या हस्तक्षेपाची विनंती करते.''