

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'पुष्पा', 'आरआरआर' आणि 'केजीएफ चॅप्टर-2' या दाक्षिणात्य चित्रपटांच्या यशानंतर आता आणखी एक मेगाबजेट चित्रपट येत आहे. दिग्दर्शक मणिरत्नम चोळ साम्राज्यावर आधारित 'पोन्नियन सेल्वन' हा बिग बजेट चित्रपट बनवत आहेत. या चित्रपटाच्या पहिल्या भागाच्या ट्रेलरमध्ये शानदार व्हिज्युअल आणि ग्रँड सेटअप पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
दाक्षिणात्य नायक विक्रम, कार्थी, जयम रवी आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय अशी तगडी स्टारकास्ट यात आहे. 'पोन्नियन सेल्वन-1' हा पॅन इंडियन चित्रपट आहे. तमिळ, तेलगु, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषेत तो रीलिज होत आहे. या चित्रपटाचे हिंदी व्हर्जनचे हक्क 7.50 कोटी रुपयांना विकले गेले आहेत. या चित्रपटाचे बजेट 500 कोटी रुपये आहे. हा चित्रपट 30 सप्टेंबर रोजी रीलिज होणार आहे.
तथापि, याच दिवशी हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांचा 'विक्रम वेधा' हा चित्रपट रीलिज होत आहे. त्यामुळे या दोन बड्या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होऊ शकते. दरम्यान, 'विक्रम वेधा'चे बजेट 175 कोटी रुपये आहे.