Vanita Kharat: ‘माझं WhatsApp हॅक केलं, मित्रांकडे पैशांची मागणी केली...’; वनिता खरातसोबत धक्कादायक स्कॅम, नेमकं काय घडलं?

Vanita Kharat WhatsApp Hack: अभिनेत्री वनिता खरातने आपलं व्हॉट्सअॅप हॅक झाल्याचा दावा करत सायबर फसवणुकीचा धक्कादायक अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Vanita Kharat WhatsApp Hack
Vanita Kharat WhatsApp HackPudhari
Published on
Updated on

Vanita Kharat WhatsApp Hack: सायबर गुन्हेगारीचे प्रमाण सध्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. एका साध्या फोन कॉलपासून सुरू झालेला प्रकार काही मिनिटांत संपूर्ण व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक होण्यापर्यंत जाऊ शकतो. अभिनेत्री वनिता खरात हिच्यासोबत असाच धक्कादायक प्रकार घडला आहे.

कुरिअर कंपनीच्या नावाने आलेल्या फोन कॉलवर विश्वास ठेवल्यानंतर तिचं व्हॉट्सअॅप हॅक झाल्याचा दावा तिने केला आहे. त्यानंतर हॅकरने तिच्या संपर्क यादीतील अनेक लोकांना मेसेज करून पैशांची मागणी केल्याने काही जणांची आर्थिक फसवणूकही झाल्याचं वनिताने सांगितलं.

या संपूर्ण घटनेबाबत वनिता खरातने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत माहिती दिली. आपल्यासोबत घडलेला हा अनुभव इतर कोणासोबत घडू नये, यासाठीच हा व्हिडीओ करत असल्याचं तिने म्हटलं आहे.

वनिताच्या म्हणण्यानुसार, तिचं एक पार्सल येणार होतं. त्याचवेळी तिला एका व्यक्तीचा फोन आला. समोरील व्यक्तीने आपण संबंधित कुरिअर कंपनीकडून बोलत असल्याचं सांगितलं आणि पार्सल पोहोचवण्यासाठी पत्त्याबाबत अडचण असल्याचं सांगितलं. वनिताने पत्ता आधीच दिला असल्याचं सांगितलं असतानाही त्या व्यक्तीकडून तिला पुन्हा-पुन्हा फोन करण्यात आले.

काही वेळानंतर समोरील व्यक्तीने दिलेल्या नंबरवर संपर्क करण्यास सांगितलं. वनिताने तो नंबर डायल केल्यानंतर काही वेळातच तिचं व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक झाल्याचा प्रकार घडला. अचानक तिच्या फोनमधून व्हॉट्सअॅप लॉगआऊट झालं. त्यानंतर फोनवर येणारे कॉलही बंद झाल्याचं तिने सांगितलं.

वनिताच्या दाव्यानुसार, सायबर फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने तिचे कॉल दुसऱ्या नंबरवर फॉरवर्ड केले. त्यानंतर तिच्या व्हॉट्सअॅप अकाउंटचा वापर करून लोकांना मदतीच्या नावाखाली मेसेज पाठवण्यात आले.

या मेसेजमध्ये, आपण मोठ्या अडचणीत असल्याचं सांगत तातडीने पैसे पाठवण्याची विनंती करण्यात आली. काही जणांकडे मोठ्या रकमेची मागणी करण्यात आली असून 62 हजार रुपयांपर्यंत पैसे पाठवण्याचे मेसेज करण्यात आल्याचं वनिताने सांगितलं. तिच्या ओळखीतील अनेकांनी या मेसेजला प्रतिसाद दिला आणि काही लोकांनी प्रत्यक्षात पैसेही पाठवले.

यामुळे हा प्रकार केवळ अकाउंट हॅकिंगपुरता मर्यादित राहिला नाही, तर वनिताच्या नावाचा आणि ओळखीचा गैरवापर करून आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न झाल्याचंही समोर आलं आहे.

या घटनेनंतर वनिता खरातने नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. व्हॉट्सअॅपवर एखाद्या मित्राकडून किंवा नातेवाईकाकडून अचानक पैशांची मागणी करणारा मेसेज आला, तर लगेच पैसे पाठवू नयेत, असं तिने सांगितलं.

Vanita Kharat WhatsApp Hack
LKG Student Video: शाळेत गेला, पण घरी परतलाच नाही! शिक्षिकेने चापट मारली अन् 6 वर्षांचा चिमुकला वर्गातच कोसळला; मृत्यूने खळबळ

विशेष म्हणजे, या प्रकरणात कुरिअर कंपनीच्या नावाचा वापर करून विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मोठ्या आणि परिचित कंपन्यांच्या नावाने फोन किंवा मेसेज आल्यामुळे अनेकदा लोक सहज विश्वास ठेवतात. सायबर गुन्हेगार नेमकं याच विश्वासाचा फायदा घेत असल्याचं अशा घटनांमधून पुन्हा स्पष्ट होत आहे.

वनिताने नागरिकांना कोणताही संशयास्पद प्रकार घडल्यास तातडीने सायबर सेलशी संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे. तसेच, आपल्या अकाउंटवरून एखादा अनपेक्षित मेसेज गेल्याचं समजल्यास त्वरित कुटुंबीय, मित्र आणि इतर संपर्कातील लोकांना याची माहिती देऊन सतर्क करणं महत्त्वाचं आहे.

या घटनेनंतर वनिताच्या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी स्वतःसोबत घडलेल्या ऑनलाइन फसवणुकीचे अनुभवही शेअर केले. यावरून सायबर फसवणुकीचे प्रकार किती वेगवेगळ्या पद्धतीने घडत आहेत, याचीही चर्चा सुरू झाली आहे.

Vanita Kharat WhatsApp Hack
Pune Police Crime News: गर्भात मुलगी असल्याचे कळताच जबरदस्ती गर्भपात अन् खुनाचा प्रयत्न; पुण्यात पोलिस उपनिरीक्षक अडचणीत

आज ऑनलाइन व्यवहार, सोशल मीडिया आणि डिजिटल कम्युनिकेशन हा दैनंदिन आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे. मात्र, तंत्रज्ञानाने जितक्या सुविधा दिल्या आहेत, तितकाच गैरवापर करणाऱ्यांचा धोकाही वाढला आहे. त्यामुळे अनोळखी नंबरवरून आलेले फोन, OTP, संशयास्पद लिंक, कॉल फॉरवर्डिंगसंदर्भातील सूचना किंवा कोणत्याही खात्याची माहिती मागणाऱ्या व्यक्तीबाबत विशेष सतर्कता बाळगणं आवश्यक आहे.

वनिता खरातच्या या अनुभवातून एक महत्त्वाचा धडा समोर येतो, सायबर फसवणुकीचा बळी कोणीही ठरू शकतं. “हे माझ्यासोबत होणार नाही,” असा विचार धोकादायक ठरू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news