

Visakhapatnam LKG Student Death: ज्या वयात हातात पुस्तकं, चेहऱ्यावर निरागस हास्य आणि शाळेत जाण्याचा उत्साह असायला हवा, त्याच वयात एका सहा वर्षांच्या चिमुकल्याच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विशाखापट्टणममधील एका शाळेत LKGमध्ये शिकणारा सहा वर्षीय मुलगा वर्गात अचानक बेशुद्ध पडला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेचा CCTV व्हिडिओ समोर आल्यानंतर खळबळ उडाली असून, मुलाच्या मृत्यूबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
ही घटना विशाखापट्टणममधील लिटिल गार्डन स्कूलमध्ये घडल्याची माहिती आहे. समोर आलेल्या CCTV फुटेजमध्ये हा चिमुकला इतर विद्यार्थ्यांसोबत वर्गात रांगेत उभा असल्याचे दिसत आहे. फुटेजनुसार, तो घाबरलेला दिसत होता. त्यानंतर शिक्षिका त्याचा गणवेश व्यवस्थित करत असल्याचे दिसत आहे.
यानंतर मुलगा रडू लागल्याचेही फुटेजमध्ये दिसत असून, याचदरम्यान शिक्षिकेने त्याला चापट मारल्याचा आरोप करण्यात आला आहे. चापट मारल्यानंतर काही क्षणांतच हा चिमुकला शिक्षिकेच्या अंगावर कोसळला. ही घटना घडताच शाळेत एकच गोंधळ उडाला. मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
मुलाने गृहपाठ पूर्ण न केल्याने त्याला शिक्षिकेने रागावल्याचा आणि त्यानंतर चापट मारल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, मुलाच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक माहितीनुसार मृत्यूचा संबंध संशयित हृदयविकाराच्या झटक्याशी जोडला जात आहे. मात्र, पोस्टमॉर्टेम आणि सविस्तर वैद्यकीय तपासणी झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मुलाचे आई-वडील आणि इतर नातेवाईक शाळेत पोहोचले. त्यांनी CCTV फुटेज पाहिल्यानंतर शाळा प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. संतप्त नातेवाईकांनी शाळेबाहेर आंदोलन करत मुलाच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
कुटुंबीयांचा आरोप आहे की, मुलासोबत झालेल्या मारहाणीनंतर त्याची प्रकृती बिघडली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. दुसरीकडे, अधिकृत वैद्यकीय तपासणी आणि पोस्टमॉर्टेम अहवाल येण्यापूर्वी मृत्यूचे कारण निश्चितपणे सांगता येणार नाही, अशी माहिती समोर येत आहे.
या धक्कादायक घटनेनंतर शाळांमधील लहान मुलांच्या सुरक्षिततेचा आणि शिक्षकांकडून होणाऱ्या वागणुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एका निरागस चिमुकल्याचा वर्गात अचानक मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.