Upcoming Marathi Movies | येत्या दोन महिन्यात पाहता येणार 'हे' सुंदर मराठी चित्रपट

Upcoming Marathi Movies - तुम्ही कोणते चित्रपट पाहणार, आणखी थोडीच प्रतीक्षा करावी लागणार आहे
image of Marathi movie poster
Upcoming Marathi Movies Instagram
Published on
Updated on

Upcoming Marathi Films

मुंबई : मे महिन्याच्या शेवटी आणि जून-जुलैमध्ये काही खास मराठी चित्रपट तुमच्या भेटीला येत आहेत. नवे विषय आणि खास स्टोरी असलेले हे चित्रपट कोणत्या तारखेला प्रदर्शित होणार आहेत, हे जाणून घेऊया.

महाराष्ट्रात प्रदर्शित होणार 'अष्टपदी'

'अष्टपदी' हा मराठी चित्रपट ३० मे रोजी महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रेमाच्या गुलाबी नात्याचे आजवर कधीही न उलगडलेले पैलू 'अष्टपदी'च्या निमित्ताने रसिकांसमोर सादर होणार आहेत. महश्री प्रॉडक्शन आणि युवराज सिने क्रिएशनच्या बॅनरखाली निर्माते उत्कर्ष जैन आणि महेंद्र पाटील यांनी 'अष्टपदी' चित्रपटाची निर्मिती केली आहे. निर्माते उत्कर्ष जैन यांनीच 'अष्टपदी'चे दिग्दर्शनही केले आहे. कथा, पटकथा व संवादलेखन क्रिएटिव्ह दिग्दर्शक महेंद्र पाटील यांनी केलं आहे. आजच्या समाजातील घटकांचे प्रतिबिंब मोठ्या पडद्यावर दाखवण्याचे काम 'अष्टपदी' करणार असल्याचे दिग्दर्शक उत्कर्ष जैन यांचे म्हणणे आहे.

image of Marathi movie poster
Instagram

या चित्रपटात संतोष जुवेकर, मयुरी कापडणे, अभिनव पाटेकर, मिलिंद फाटक, मोना कामत, स्वप्नील राजशेखर, माधव अभ्यंकर, विशाल अर्जुन, विनिता काळे, चंदा सारसेकर, कल्पना राणे, विशाल अर्जुन, उत्कर्ष जैन, महेंद्र पाटील, नयना बिडवे हे कलाकार विविध व्यक्तिरेखांमध्ये झळकणार आहेत. गणेश चेऊलकर आणि प्रशांत जामदार यांनी लिहिलेल्या अर्थपूर्ण गीतरचनांना संगीतकार मिलिंद मोरे यांनी सुमधूर स्वरसाज चढवला आहे. मिलिंद मोरे यांनीच या चित्रपटाला पार्श्वसंगीतही दिलं असून, कला दिग्दर्शन निलेश रसाळ यांनी केलं आहे. रंगभूषा अतुल शिधये यांनी, तर वेशभूषा अंजली खोब्रेकर व स्वप्ना राऊत यांनी केली आहे. डिओपी धनराज वाघ यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून नृत्य दिग्दर्शन दिग्विजय जोशी यांनी केले आहे. अजय खाडे 'अष्टपदी'चे कार्यकारी निर्माते आहेत, तर राहुल पाटील आणि नंदू आचरेकर सहदिग्दर्शक आहेत.

तीन अतरंगी मित्रांची भन्नाट कहाणी - ‘आंबट शौकीन’

‘आंबट शौकीन’ चित्रपटाचे टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. तीन अवलिया मित्रांची कहाणी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या खट्याळ, अतरंगी मित्रांची मुली पटवण्यासाठी चाललेली धडपड या चित्रपटात पाहायला मिळेल. हेक्सव्हिजन एंटरटेनमेंट, एसएस अँड केएल ब्रदर्स प्रॉडक्शन्स, लॅब्रोस एंटरटेनमेंट आणि बिग ब्रेन प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘आंबट शौकीन’ या चित्रपटाचं दिग्दर्शन निखिल वैरागर यांनी केले असून अक्षय टंकसाळे, निखिल वैरागर व किरण गायकवाड यांच्या प्रमुख भूमिका असून तसेच प्रार्थना बेहेरे, भाऊ कदम, पार्थ भालेराव, अभिजीत खांडकेकर, मोनालिसा बागल, अमेय वाघ, चिन्मय संत, राहुल मगदूम, श्रीकांत यादव, आशय कुलकर्णी, शुभंकर एकबोटे, गौतमी पाटील, रमेश परदेशी, मानिनी दुर्गे, देवेंद्र गायकवाड, आकाश जाधव, आर्यक पाठक, विनोद खेडेकर, चेतन रायकर असे मराठी चित्रपटसृष्टीतील काही दमदार कलाकारांची भलीमोठी फौजही पाहायला मिळणार आहे.

image of Marathi movie poster
Instagram

दिग्दर्शक निखिल वैरागर म्हणतात, “ ‘आंबट शौकीन’ या चित्रपटाच्या माध्यमातून एक वेगळा विषय प्रेक्षकांसमोर हलक्याफुलक्या, मजेशीर पद्धतीने मांडत आहे. सोशल मीडियाच्या दुनियेत हरवलेले आणि प्रेमात यश मिळवण्यासाठी धडपडणारे तीन मित्र ही कल्पना प्रेक्षकांचे नक्कीच खूप मनोरंजन करेल, याची मला खात्री आहे. तसेच उत्तम कलाकारांच्या अभिनयाने चित्रपट अजूनच कमाल बनला आहे.” ‘आंबट शौकीन’ या चित्रपटाची कथा निखिल वैरागर यांची असून प्रफुल्ल काकाणी, रंजना मोहित लखोटिया, अनघ भुतडा व निलेश राठी निर्माते आहेत. चित्रपटाची पटकथा आणि संवाद अक्षय टंकसाळे व अमित बेंद्रे यांचे आहेत. येत्या १३ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

image of Marathi movie poster
Kankhajura | गहिरी गुपीते आणि गहिरा अपराधीभाव... 'कानखजुरा'चे स्ट्रीमिंग यादिवशी
image of Marathi movie poster
Instagram

'सजना' चित्रपट

रोमँटिक चित्रपट 'सजना' आपल्या भेटीला लवकरच येणार आहे. याआधी शशिकांत धोत्रे निर्मित आणि दिग्दर्शित 'सजना' चित्रपटाचं एक हळवं गीत "झोका" संगीतप्रेमींना आवडलं होतं. "झोका" हे नवीन मराठी रोमान्टिक गाणं भुंगा म्युझिकच्या बॅनरखाली प्रदर्शित झालं आहे. सूर्यमुखी फुलांच्या सोनसळी शेतात आणि पाण्याखालच्या अद्भुत दृश्यांमध्ये गाणं चित्रीत झालं. गाण्याचे गायक राजेश्वरी पवार आणि ओंकारस्वरूप हे आहेत. तर संगीतकार सुद्धा ओंकारस्वरूप आहे, गीतकार हे सुहास मुंडे आहेत. या चित्रपटाची निर्मिती स्वतः शशिकांत धोत्रे ह्यांनी केली आहे तर कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन सुद्धा शशिकांत धोत्रे ह्यांनी केलं आहे. "सजना" चित्रपटगृहात २७ जून २०२५ पासून प्रदर्शित होणार आहे.

image of Marathi movie poster
Samsara Movie Teaser | सायली संजीव, ऋषी सक्सेनाच्या 'समसारा' चित्रपटाचा टीजर लाँच

‘गाडी नंबर १७६०’ - पैशांनी भरलेली बॅग, एक गाडी आणि अनेक रहस्ये

‘गाडी नंबर १७६०’ येत्या ४ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे पोस्टर देखील लक्षवेधी ठरले होते. पोस्टरमध्ये एक गाडी व त्यावर ठेवलेली पैशांनी भरलेली काळी बॅग दिसत आहे. पैशांनी भरलेली ही बॅग नेमकी कोणाची आहे? गाडी नंबर १७६० चं रहस्य काय रहस्य आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ४ जुलैला मिळतील. या चित्रपटात प्रथमेश परब, शुभंकर तावडे, प्रियदर्शिनी इंदलकर, सुहास जोशी, प्रसाद खांडेकर, श्रीकांत यादव आणि शशांक शेंडे यांसारखे अफलातून कलाकार पाहायला मिळणार आहेत. दिग्दर्शक योगिराज संजय गायकवाड म्हणतात, “ ‘गाडी नंबर १७६०’ या चित्रपटात एक ॲडव्हेंचर आहे जे पाहाणे प्रेक्षकांसाठी रंजक ठरेल. प्रत्येक पात्राचे वेगळे रहस्य आहे, प्रत्येक वळणावर थरार आहे, यामुळे प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणारा हा चित्रपट आहे. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना काहीतरी वेगळे पाहायला मिळेल.”

निर्माते कैलाश सोराडी म्हणतात, “ हा एक वेगळा चित्रपट आहे. मराठी सिनेसृष्टीत अशा प्रकारचे चित्रपट फार कमी बनले आहेत. या चित्रपटात थ्रिल, सस्पेन्स, कॉमेडी, ड्रामा एकत्र पाहायला मिळेल. मनोरंजनाचा हा एक धमाका आहे. पोस्टरमुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपट आल्यावरही प्रेक्षकांची हीच उत्सुकता कायम राहील, याची मला खात्री आहे. दमदार कलाकारांच्या उत्तम अभिनयाने चित्रपट रंगला असून प्रेक्षकांना ‘गाडी नंबर १७६०’ ची ही कहाणी नक्कीच आवडेल.”तन्वी फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माते कैलाश सोराडी आणि विमला सोराडी आहेत, तर लेखन आणि दिग्दर्शन योगीराज संजय गायकवाड यांचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news