

Mohit Raina-Roshan Mathew Kankhajura streaming
मुंबई : सोनी लिव्हची कानखजुरा ही वेब सीरिज एका पछाडणाऱ्या गोष्टीची सफर प्रेक्षकांना घडवणार आहे. या गोष्टीत शांतता फसवी आहे आणि नजरेआड लपलेल्या बाबी डोळ्याला दिसणाऱ्या बाबींहून खूपच घातक आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरने एका अनोख्या जगाची झलक प्रेक्षकांना दाखवली आहे. या जगात अपराधीभाव पाठ सोडत नाही, रहस्ये उकळत राहतात आणि भूतकाळ सूड उगवतो.
मॅगपाय या समीक्षकांनी नावाजलेल्या इझ्रायली मालिकेचे हे मनाची पकड घेणारे भारतीय रूपांतर कानखजुरा भारतीय देहबोली आत्मसात करून मूळ कथेला एका वेगळ्या रूपात सादर करते. मात्र, कथेचे मूळ स्वरूप आणि भावनिक उत्कटता कायम राखते. या कथेत दोन दुरावलेल्या भावांमधील नात्याचा वेध घेण्यात आला आहे. स्मृती आणि वास्तव यांच्यातील सीमा धूसर होत असताना या भावांना त्यांच्या काळ्याकुट्ट भूतकाळाचा सामना करणे भाग पडते. तुमच्या स्वत:च्यात आठवणींचे रूपांतर जेथून सुटका नाही अशा तुरुंगात झाले तर काय घडत असेल.
निशाची भूमिका करणारी सारा जेन डायस म्हणाली, “'कानखजुरा'मध्ये खोलवर तळ ढवळून टाकणारे काहीतरी आहे. याची कथा तर अस्वस्थ करणारी आहेच, पण अपराधीभाव, कुटुंब, स्मृती या सर्वांचा सामना करण्यास प्रेक्षकांना भाग पाडेल असे काहीतरी यात आहे. निशा व्यक्तिरेखा स्वत: आतून ढासळत असतानाही ती सगळे काही सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे. एवढे पदर असलेली, बारकावे असलेली व्यक्तिरेखा साकारणे सोपे नव्हते पण ती केल्यामुळे मला खूपच सक्षम झाल्यासारखे वाटले.”
अजय राय यांची निर्मिती आणि चंदन अरोरा यांचे दिग्दर्शन असलेल्या 'कानखजुरा'मध्ये खिळवून ठेवणाऱ्या कलावंतांची फौज आहे. मोहित रैना, रोशन मॅथ्यूज, सारा जेन डायस, महेश शेट्टी, निनाद कामत, त्रिनेत्रा हलदार, हीबा शाह आणि उषा नाडकर्णी हे सर्व कलावंत यात आहेत. कानखजुरा ३० मेपासून सोनी लिव्हवर स्ट्रीम होत आहे.