

मराठी सिनेसृष्टीत लवकरच विविध विषयांवरील चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. कुठे गुन्ह्यांची थरारक उकल पाहायला मिळणार आहे, तर कुठे हास्याचा मनमुराद आनंद देणाऱ्या कॉमेडी फिल्म्स प्रदर्शित होणार आहेत. नव्या दिग्दर्शकांची वेगळी मांडणी, दमदार कलाकार आणि आशयघन कथा यामुळे आगामी मराठी चित्रपटांकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.
Upcoming Marathi Movies release dates
मराठी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक आणि निर्माते वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट घेऊन येत आहेत. आगामी मराठी चित्रपटांमध्ये थरारक गुन्हेगारी कथा, सामाजिक विषयांवरील गंभीर मांडणी तसेच हलक्याफुलक्या विनोदी चित्रपटांचा समावेश पाहायला मिळणार आहे. गुन्हेगारी आणि तपासावर आधारित चित्रपटांमध्ये दमदार कथा, वास्तववादी मांडणी आणि प्रभावी अभिनयावर भर देण्यात आला आहे. काही चित्रपटांमध्ये अनुभवी कलाकारांसोबत नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. दुसरीकडे, प्रेक्षकांना हसवण्यासाठी आणि दैनंदिन तणावापासून थोडा विरंगुळा देण्यासाठी विनोदी चित्रपटांचीही मोठी रांग लागली आहे. कौटुंबिक कथानक, खुसखुशीत संवाद असणारे विनोदी चित्रपट सर्व वयोगटातील प्रेक्षकांना भावतील, असेही आहेत.
रणपति शिवराय स्वारी आग्रा
औरंगजेबासारखा अत्यंत दगाबाज, कपटी बादशहा, सर्वत्र कडेकोट पहारा आणि आजूबाजूला निराशेचा अंधार अशा मोठ्या बिकट अवस्थेत शिवाजी महाराजांची आग्रा भेट झाली होती. माणसांची उत्तम पारख असणारे, दूरदृष्टी व राजकीय जाण असणाऱ्या महाराजांनी या सगळ्या गोष्टी कशा हाताळल्या आणि ही स्वारी कशी यशस्वी केली याची कथा पाहायला मिळणार आहे. पॅनोरमा स्टुडिओज, मुगाफी निर्मित आणि दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित चित्रपट आहे.
कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, विपुल अग्रवाल, जेनील परमार, मुरलीधर छतवानी चित्रपटाचे निर्माते आहेत. सहनिर्माते रवींद्र औटी, तान्शा बत्रा, आलोक शर्मा आहेत. मृणाल कुलकर्णी, अभिजीत श्वेतचंद्र, समीर धर्माधिकारी, अजय पूरकर, दिग्पाल लांजेकर, स्मिता शेवाळे, पुनीत इस्सार, विराजस कुलकर्णी, प्रसन्न केतकर, निखिल राऊत, योगेश सोमण, अक्षय वाघमारे, बिपीन सुर्वे, ऋषी सक्सेना, नुपूर दैठणकर, सचिन देशपांडे, अमिषा ठाकूर, अभिलाष चौधरी, अयन कर्णे, अमित देशमुख, अभ्यंग कुवळेकर, ज्ञानेश वाडेकर, आशुतोष वाडेकर, भूषण शिवतारे, संकेत ओक कलाकारांच्या भूमिका आहेत. ६ फेब्रुवारीपासून चित्रपटगृहात हा सिनेमा पाहता येणार आहे.
'रुबाब'
डॅशिंग लव्हस्टोरी रुबाबचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. झी स्टुडिओजने ‘तुझ्यासारखी नको… तूच पाहिजे’ ही लक्षवेधी टॅगलाईन घेऊन आलेला चित्रपट ‘रुबाब’ केवळ एक प्रेमकहाणी नाही तर स्वतःच्या अटींवर जगणाऱ्या, आत्मसन्मान जपणाऱ्या आणि प्रेमासाठी ठाम उभ्या राहाणाऱ्या आजच्या तरुणाईची गोष्ट आहे.
‘रुबाब’ या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन शेखर बापू रणखांबे यांनी केले आहे. संजय झणकर आणि गौरी झणकर हे चित्रपटाचे निर्माते आहेत. उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. या चित्रपटात संभाजी ससाणे आणि शितल पाटील प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट ६ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.
केस नं. ७३
लायलॅक मोशन पिक्चर्स आणि डस्क स्टुडिओज निर्मित ‘केस नं. ७३’ हा मराठी चित्रपट ६ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. मिलिंद मुक्तेश्वर आपटे यांनी केले असून चित्रपटाची निर्मिती शर्वरी सतीश वटक, डॉ. मिलिंद मुक्तेश्वर आपटे यांनी केली आहे. सहनिर्माते प्रविण अरुण खंगार आहेत. अभिनेते शैलेश दातार एसपी संजय देशमुख ही जिगरबाज आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहेत. शैलेश दातार यांच्यासोबत अशोक शिंदे, राजसी भावे, नंदिता पाटकर, पियुष आपटे अशी तगडी स्टारकास्ट चित्रपटात दिसणार आहे.
एसपी संजय देशमुख हे कर्तव्यनिष्ठ आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या प्रदीर्घ सेवाकाळात कोणताही गुन्हा प्रलंबित राहिलेला नाही. मात्र सेवेतून निवृत्ती घेण्याच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर त्यांच्यासमोर एक अतिशय क्लिष्ट प्रकरण उभे राहते. या केसचे गूढ उकलण्याचे मोठे दडपण त्यांच्यावर येते, पण पुरावे आणि धागेदोरे सहज मिळत नाहीत. प्रत्येक क्षण आव्हानात्मक ठरत असताना, धैर्य, शिस्त आणि सचोटीच्या जोरावर ही भूमिका कथेला अनपेक्षित वळण देणारी ठरते.
लग्नाचा शॉट
लग्न म्हणजे आनंद, गडबड, नात्यांची गुंफण...अनपेक्षित क्षणांचा संगम मोठ्या पडद्यावर मांडण्यासाठी चित्रपट ‘लग्नाचा शॉट’ येत आहे. एका लग्नाच्या तयारीपासून सुरू होणारी गोष्ट पुढे कशी अनपेक्षित वळणं घेते. चुकीचे निर्णय, नात्यांमधील गैरसमज आणि त्यातून निर्माण होणारा गोंधळ हे सगळं अगदी हलक्याफुलक्या, विनोदी शैलीत प्रभावीपणे मांडण्यात आलं आहे. अभि आणि कृतिकाच्या आयुष्यात अचानक घडणाऱ्या घटनांमुळे त्यांचा प्रवास वेगळ्याच दिशेने वळतो. या प्रवासात अनेक मजेशीर प्रसंगांसोबत काही भावनिक क्षणही पाहायला मिळतात.
महापर्व फिल्म्स निर्मित आणि जिजा फिल्म कंपनी यांच्या सहयोगाने साकारलेल्या ‘लग्नाचा शॉट’ या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन अक्षय गोरे यांनी केले आहे. गीत-संगीत प्रवीण कोळी, योगिता कोळी, अक्षय गोरे, विजय गोरे, अभिषेक कोळी आणि सुरेश मगनलाल प्रजापती हे निर्माते आहेत. हा चित्रपट ६ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होतोय. चित्रपटात प्रियदर्शिनी इंदलकर, अभिजीत आमकार, प्रभाकर मोरे, अभिजीत चव्हाण, राजन ताम्हाणे, लीना पंडित, संजय कुलकर्णी, विजय पवार, मनोहर जाधव, संजीवनी पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
पुन्हा एकदा साडे माडे तीन
कुरळे बंधू केमिस्ट्री म्हणजे नुसती गोष्ट नाही, तर धमाल, टोमणे, खट्याळपणा आणि मनमोकळा आनंद यांचा अखंड उत्सव! तीन भावांचा हा धमाकेदार, निरागस आणि मनमोकळा जल्लोष मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे. या चित्रपटात भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव आणि रिंकू राजगुरू यांच्या प्रमुख भूमिका असून संजय नार्वेकर यात पाहुणे कलाकार म्हणून झळकणार आहेत. उषा काकडे प्रॉडक्शन्स, अमेय विनोद खोपकर पिक्चर्स यांच्या सहकार्याने साकारलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन अंकुश चौधरी यांनी केलं आहे.
उषा काकडे, पुष्कर यावलकर, सुधीर कोलते, स्वाती खोपकर आणि निनाद नंदकुमार बत्तीन हे निर्माते असून मोहसिन खान, यशराज टिळेकर, सौरभ ललवाणी आणि धनविक एंटरटेनमेंट सहनिर्माते आहेत. १३ फेब्रुवारीपासून चित्रपटगृहात 'पुन्हा एकदा साडे माडे तीन' पाहता येणार आहे.
"मन आतले मनातले"
मानसी नाईकची मध्यवर्ती भूमिका असलेला "मन आतले मनातले" १३ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सूर्य फिल्म वर्ल्ड प्रस्तुत "मन आतले मनातले" या चित्रपटाची निर्मिती सुरेन महापात्रा यांनी केली आहे. सुरेन महापात्रा यांनी चित्रपटाचं कथा आणि पटकथा लेखन, तर संवादलेखन मनोज सुधाकर येऊनकर यांनी केले आहे. तर जेम्स अँथनी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. अभिजित मजुमदार यांनी संगीत दिग्दर्शन, डॉ. सुनंदा डिवरे पळवणकर यांनी गीतलेखन केलं आहे. सुदर्शन सेनापती यांनी छायांकन, मलया आणि बिपिन यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे.
चित्रपटात अभिनेत्री मानसी नाईक अभिनेता सुरेन महापात्रा, अभिनेता उपेंद्र लिमये, ऋतुराज फडके, संदीप गायकवाड, कमलेशन सावंत, अरूण नलावडे, यतीन कार्येकर, सिया पाटील, राजेश आहेर, विनित भोंडे अशी तगडी स्टारकास्ट आहे. अनेक मराठी, हिंदी, दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारलेले अभिनेते उपेंद्र लिमये आता दमदार खलनायकी भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात त्यांनी खलनायकी भूमिका साकारली आहे.
माया
‘अलिबाबा आणि चाळीशीतले चोर’ आणि ‘बिन लग्नाची गोष्ट’सारख्या चित्रपटांतून नात्यांवर संवेदनशील भाष्य करणाऱ्या आदित्य इंगळे आता ‘माया’ चित्रपट आणत आहेत. चित्रपटात सिद्धार्थ चांदेकरने साकारलेली हाऊस फादरची भूमिका नात्यांकडे पाहाण्याचा वेगळा, समजूतदार दृष्टिकोन देते. मुक्ता बर्वे, विजय केंकरे आणि रोहिणी हट्टंगडी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. गिरीश ओक यांची व्यक्तिरेखा विशेष लक्ष वेधून घेते. आजाराने ग्रस्त असलेला, अंतर्मुख आणि काहीसा विचित्र स्वभाव असलेला हा माणूस मनात खोलवर साठवून ठेवलेल्या आघातांमुळे इतरांपासून दुरावलेला दिसतो. त्यांचा अस्वस्थपणा आणि मनातील अढी कथेला गंभीर आणि विचारप्रवर्तक वळण देताना दिसते.
शालिनी सिनेमाज आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाचे निर्माते डॉ. सुनील दातार, अलका मधुकर दातार आणि नितीन प्रकाश वैद्य आहेत. आदित्य इंगळे दिग्दर्शित ‘माया’ हा चित्रपट २७ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. रोहिणी हट्टंगडी आणि मुक्ता बर्वे या दोन दिग्गज अभिनेत्री पुन्हा एकदा एकत्र येत आहेत.
सालबर्डी
महाराष्ट्रातल्या दुर्गम भागात असलेल्या ‘सालबर्डी’ या गावातल्या अशाच एका रहस्याचा आणि तिथे घडणाऱ्या विचित्र घटनांच्या शोधाची कहाणी सांगणारा ‘सालबर्डी’ हा थरारपट एप्रिल महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेब्यूला फिल्म्स निर्मित ‘सालबर्डी’ चित्रपटाची निर्मिती अनिल देवडे पाटील, डॉ.गजानन जाधव, राम जाधव यांनी केली आहे. रमेश साहेबराव चौधरी या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. ‘सालबर्डी’ चित्रपटात कलाकार कोण? हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
‘सालबर्डी’ चित्रपटाचे छायांकन आणि संकलन सिद्धेश संतोष मोरे यांचे आहे. पटकथा आणि संवाद रोहित शुक्रे यांचे आहेत. गुरु ठाकूर, मुकुंद भालेराव लिखित गीतांना पद्मनाभ गायकवाड यांचे संगीत लाभले आहे. पार्श्वसंगीत अमर मोहिले, अजय गोगावले, जावेद अली, आनंदी जोशी या गायकांचा स्वरसाज आहे. नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर, आशीष पाटील, कार्यकारी निर्माते दिपक कुदळे पाटील आहेत. वेशभूषा प्रणिता चिंदगे तर रंगभूषा श्रीनिवास मेनूगे यांची आहे. कलादिग्दर्शन प्रदीप गुरव यांचे आहे.
मर्दिनी
मोठ्या पडद्यावर उलगडणार नारीसामर्थ्याची गाथा श्रेयस तळपदे प्रस्तुत चित्रपट मर्दिनी उलगडणार आहे. हा चित्रपट ३ जुलै २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रार्थना बेहेरे, अभिजीत खांडकेकर, जितेंद्र जोशी, राजेश भोसले यांसारख्या प्रमुख कलाकारांचे अभिनय पाहायला मिळणार आहे. बालकलाकार मायरा वैकुळ हिची भूमिका देखील मह्त्वाची आहे.
अजय मयेकर यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट असून, दिप्ती तळपदे यांच्या निर्मितीखाली ‘मर्दिनी’ साकारला जात आहे. तर सह निर्माती टिना राकेश कोठारी, छायांकन शब्बीर नाईक, संकलन अभिषेक शेठ, संगीत हितेश मोडक, पटकथा आणि संवाद महाबळेश्वर नार्वेकर यांनी केले आहे.