Tiger Shroff Case: सकाळी 9.45 ला टीप, 10.15 ला आरोपींना ट्रेनमधून अटक; कोटा रेल्वे स्थानकावरील 30 मिनिटांचा थरार समोर

Tiger Shroff Firing Case: सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी सापळा रचला आणि सुमारे 10.15 वाजता कारवाई केल्याची माहिती समोर आली.
Tiger Shroff Firing Case
Tiger Shroff Firing CasePudhari
Published on: 
Updated on: 

Tiger Shroff Firing Case: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मुंबईत गोळीबार करून पोलिसांच्या हातावर तुरी देण्याच्या तयारीत असलेल्या तीन संशयितांना राजस्थानमधील कोटा पोलिसांनी ट्रेनमधून ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास पोलिसांना संशयित ट्रेनने कोट्यात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर अवघ्या काही वेळात पोलिसांनी सापळा रचला. सकाळी 10.15 वाजण्याच्या सुमारास संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अवघ्या अर्ध्या तासाच्या आत घडलेल्या या कारवाईमुळे संपूर्ण प्रकरणाला नवं वळण लागलं आहे.

सकाळी टीप मिळाली अन् पोलिसांची धावपळ सुरू

टायगर श्रॉफच्या गोळीबार प्रकरणातील संशयित रेल्वेने प्रवास करत असल्याची माहिती कोटा पोलिसांना मिळाली. हे तिघे कोट्यात पोहोचणार असल्याचे समजताच पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. कोटा शहर पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता रेल्वे स्थानकावर सापळा रचला.

पोलिसांसमोर आव्हान होते ते संशयितांना ट्रेनमधून बाहेर पडण्याआधी किंवा गर्दीतून निसटण्याआधी पकडण्याचे. त्यासाठी पोलिसांच्या पथकाने संबंधित ट्रेनची कसून तपासणी केली. अवघ्या 15 मिनिटांत सापळा रचून संपूर्ण ट्रेनमध्ये शोधमोहीम राबवण्यात आली. अखेर पोलिसांच्या या वेगवान कारवाईला यश आले आणि तिघेही संशयित त्यांच्या ताब्यात आले.

कोटा पोलीस अधीक्षक तेजस्विनी गौतम यांनी या कारवाईची माहिती दिली. संशयितांना पकडल्यानंतर आता त्यांना मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे-जयपूर एक्स्प्रेसमधून प्रवास; पुढचे लक्ष्य नेपाळ?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही संशयित पुणे-जयपूर एक्स्प्रेसच्या सामान्य डब्यातून प्रवास करत होते. त्यांचा पुढचा मुक्काम दिल्ली येथे होता. दिल्ली गाठल्यानंतर नेपाळच्या दिशेने पळून जाण्याची त्यांची योजना असल्याची माहिती प्राथमिक चौकशीत समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

मात्र, त्यांचा हा प्लॅन यशस्वी होण्याआधीच कोटा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. मुंबईतील गोळीबार प्रकरणानंतर संशयितांनी प्रवासाचा मार्ग बदलला होता का, त्यांना कोणी मदत केली आणि त्यांच्या पळून जाण्याच्या प्लॅनमागे आणखी कोणाचा सहभाग होता, या प्रश्नांची उत्तरे आता पुढील तपासातून समोर येण्याची शक्यता आहे.

कोण आहेत ताब्यात घेतलेले तिघे?

कोटा पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तिघांमध्ये दोन प्रौढ संशयित आणि एका अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे. पहिला संशयित रेहान ऊर्फ सुक्का हा हरियाणातील सोनीपत येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. दुसरा संशयित हृतिक कुर्मी ऊर्फ रोशन हा बिहारमधील बेगुसरायचा रहिवासी असून, तो गेल्या काही वर्षांपासून मुंबईत राहत असल्याची माहिती आहे. तिसरा संशयित अल्पवयीन आहे. या तिघांना कोटा पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांना पुढील तपासासाठी मुंबई पोलिसांकडे सोपवण्यात येणार आहे.

Tiger Shroff Firing Case
Tiger Shroff Firing Case: तीन मालक, कागदपत्रांचा घोळ अन् गोळीबार! टायगर श्रॉफ प्रकरणात पल्सर बाईक जप्त; तपासात नवा खुलासा

शस्त्रे कुठे गायब झाली? पोलिसांसमोर मोठा प्रश्न

या प्रकरणात संशयितांना पकडण्यात यश आले असले, तरी गोळीबारासाठी वापरलेली शस्त्रे अद्याप सापडलेली नाहीत. कोटा पोलीस अधीक्षक तेजस्विनी गौतम यांनी याला दुजोरा दिला. संशयितांची चौकशी करून शस्त्रांचे काय केले, ती कुठे ठेवली किंवा कोणाकडे दिली, याचा शोध घेतला जाणार आहे. गोळीबारानंतर शस्त्रे सोबत ठेवली होती की ती दुसऱ्या व्यक्तीकडे दिली होती, हा तपासातील महत्त्वाचा मुद्दा आहे.

अनिल पंडितचे नाव चर्चेत; लॉरेन्स बिश्नोईशी संबंध?

प्राथमिक चौकशीदरम्यान अनिल पंडित हा रेहानच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाल्याचे कोटा पोलिसांनी सांगितले. अनिल पंडितचा लॉरेन्स बिश्नोईशी संबंध असल्याचेही पोलिस अधीक्षकांनी सांगितले. मात्र, या संपर्काचे नेमके स्वरूप काय होते, गोळीबाराच्या कटात त्याची भूमिका होती का आणि या प्रकरणाचा इतर कोणाशी संबंध आहे का, हे अद्याप तपासातून स्पष्ट व्हायचे आहे.

Tiger Shroff Firing Case
Tiger Shroff Juhu Firing: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अभिनेता टायगर श्रॉफची भेट; म्हणाले, 'मुंबईत गुन्हेगारी टोळीची...'

आता मुंबई पोलिसांच्या चौकशीतून उलगडणार गूढ

कोटा पोलिसांनी तिन्ही संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर मुंबई पोलिसांचे पथक कोट्यात पोहोचले. आता संशयितांना मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे तेजस्विनी गौतम यांनी सांगितले.

गोळीबार कोणी आणि कोणाच्या सांगण्यावरून केला? त्यासाठी शस्त्रे कुठून मिळवली? संशयितांना पळून जाण्यासाठी कोणी मदत केली? अनिल पंडित आणि रेहान यांच्यातील संपर्काचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का? या प्रश्नांची उत्तरे पुढील तपासात शोधली जाणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news