

Tiger Shroff Firing Case: अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर झालेल्या गोळीबार प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी सुरत एक्स्प्रेसमधून दोन संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार केल्यानंतर आरोपी सुरतच्या दिशेने पळून गेल्याचा पोलिसांना संशय होता.
त्यानंतर आणखी तीन आरोपींना राजस्थानच्या कोटा रेल्वे स्थानकातून ताब्यात घेण्यात आले. अँटी गँगस्टर टास्क फोर्स आणि राजस्थान पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या ट्रेनमधून त्यांना पकडले. आरोपींमध्ये महाराष्ट्रातील एक आणि हरियाणातील दोघांचा समावेश आहे.
या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला आहे. गोळीबार करण्यापूर्वी आरोपींनी टायगर श्रॉफच्या घराची आणि तो फुटबॉल खेळण्यासाठी जात असलेल्या मैदानाची रेकी केल्याचा संशय आहे. म्हणजेच, हल्ल्यापूर्वी आरोपींनी टायगरच्या हालचालींवर लक्ष ठेवले होते. त्याला कोणत्या गाडीतून प्रवास करण्याची सवय आहे, याची माहितीही त्यांनी मिळवली असावी, असा पोलिसांना संशय आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टायगर श्रॉफच्या गाडीवर हल्ला करण्यापूर्वी आरोपींनी परिसराची पाहणी केली होती. गोळीबार करण्याआधी ते पुष्पा पार्कजवळ सुमारे ४५ मिनिटे थांबले होते. टायगरची फुटबॉल मॅच संपण्याची ते वाट पाहत होते, असा संशय आहे.
या काळात टायगर श्रॉफ एकदा मैदानावरील सुरक्षा जाळीजवळ आला होता. त्यावेळीही संशयित घटनास्थळी उपस्थित होते. मात्र, त्यांनी त्या वेळी हल्ला केला नाही. त्यानंतर योग्य संधी मिळताच त्यांनी टायगरच्या बीएमडब्ल्यू गाडीवर गोळीबार केल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.
या हल्ल्यामागे केवळ गोळीबार करणारे आरोपीच नव्हते, तर टायगरच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वेगळी टीमही काम करत असावी, असा मुंबई पोलिसांना संशय आहे. रेकी करणाऱ्या व्यक्तींनी टायगर कोणत्या गाडीतून प्रवास करतो, तो कुठे जातो आणि त्याच्या हालचाली कशा असतात, याची माहिती गोळीबार करणाऱ्यांना दिली असावी, अशी माहिती पोलिसांना आहे.
या प्रकरणातील तपासातून महत्त्वाची माहिती समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. टायगर श्रॉफच्या बीएमडब्ल्यू गाडीवर गोळीबार करण्यासाठी हल्लेखोरांनी गावठी पिस्तुलाचा वापर केल्याचे समजते. या प्रकारच्या पिस्तुलाला काही ठिकाणी 'कॉपी पीस' असेही म्हटले जाते.
हल्लेखोरांनी गाडीच्या पुढील काचेवर आणि बाजूच्या खिडकीवर निशाणा साधत एकूण सात गोळ्या झाडल्याची माहिती आहे. त्यापैकी पाच गोळ्या गाडीला लागल्या, तर दोन गोळ्या हवेत गेल्या.
गोळीबार सुरू असताना एका हल्लेखोराने गाडीच्या प्रवाशाच्या बाजूच्या खिडकीजवळ जाऊन अगदी जवळून टायगर श्रॉफवर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या पिस्तुलात बिघाड झाल्याने गोळी झाडता आली नाही, असा संशय आहे. त्याने दोनदा प्रयत्न केला, तरी शस्त्र चालले नाही, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
पिस्तुलातील बिघाडामुळे टायगरवर जवळून गोळी झाडण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरल्याचा अंदाज तपास यंत्रणा व्यक्त करत आहेत.
गोळीबार केल्यानंतर दोन्ही हल्लेखोर त्याच्या आणखी एका साथीदाराने तयार ठेवलेल्या मोटारसायकलवरून पळून गेल्याचा संशय आहे. त्यानंतर आरोपी अंधेरी पश्चिम रेल्वे स्थानकाच्या परिसरात पोहोचले. पोलिसांच्या नजरेत येऊ नये, या उद्देशाने त्यांनी एका पोलीस चौकीजवळ दुचाकी सोडल्याची माहिती समोर आली आहे.
त्यानंतर तिन्ही आरोपी वेगवेगळ्या दिशांनी गर्दीत मिसळून पसार झाल्याचा संशय आहे. स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासताना काही कॅमेरे तांत्रिक बिघाडामुळे बंद असल्याचे किंवा व्यवस्थित काम करत नसल्याचे आढळले. त्यामुळे आरोपींच्या हालचाली स्पष्टपणे समजून घेण्यात अडचणी येत आहेत.
रेल्वे पोलिसांकडील सीसीटीव्ही फुटेजचीही पडताळणी सुरू आहे. या प्रकरणात आतापर्यंत दोन प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवण्यात आल्याची माहिती आहे.
या हल्ल्यात दोन पिस्तुलांचा वापर झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी एका पिस्तुलातून एकदा गोळ्या भरल्यानंतर नऊ गोळ्या झाडता येतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे. दुसऱ्या पिस्तुलात बिघाड झाल्याने त्यातून गोळीबार करता आला नाही असा संशय आहे.
हल्लेखोरांनी वापरलेली शस्त्रे नेमकी कोणत्या प्रकारची होती, ती कुठून मिळवली आणि त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.
या प्रकरणातील तिन्ही आरोपी २० ते २५ वयोगटातील असल्याची माहिती समोर आली आहे. या तरुणांना भडकवून आणि पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून हा हल्ला घडवून आणला असावा, असा पोलिसांना संशय आहे.
हल्ल्यामागे नेमके कोण आहे, आरोपींना शस्त्रे कोणी पुरवली आणि टायगर श्रॉफच्या हालचालींची माहिती कोणी दिली, या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे काम सुरू आहे. गोळीबारामागे आणखी काही लोकांचा सहभाग आहे का, याचाही तपास केला जात आहे.