

‘स्पायडर-मॅन’च्या तुफान लोकप्रियतेमुळे बॉक्स ऑफिसवर स्पर्धा वाढलेली असतानाही ‘द ओडिसी’ने आपली कमाईची घोडदौड कायम ठेवली आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या २४ दिवसांत १६६.८९ कोटी रुपयांची कमाई केल्याचे समोर आले असून, त्यामुळे या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस प्रवासाकडे चाहत्यांचे आणि सिनेरसिकांचे लक्ष लागले आहे.
हॉलिवूडच्या बॉक्स ऑफिसवर सध्या स्पायडर-मॅन : ब्रँड न्यू डेची जोरदार चर्चा सुरू आहे. प्रदर्शनानंतर या चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये मोठी क्रेझ निर्माण केली असली, तरी दुसरीकडे ख्रिस्तोफर नोलन यांच्या ‘द ओडिसी’नेही आपली पकड अजून सैल केलेली नाही. चित्रप प्रदर्शनाचा चौथा आठवडा सुरू असतानाही चित्रपटाच्या कमाईचा वेग कायम आहे. २४ दिवसांत ‘द ओडिसी’ने १६६.८९ कोटी रुपयांची कमाई केली आहे. सर्व भाषांमधील कमाई पाहता हा आकडा १७८.३१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
‘द ओडिसी’ने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी १६.०८ कोटी रुपयांची कमाई करत दमदार सुरुवात केली होती. पहिल्या आठवड्यामध्ये चित्रपटाने ५६.८५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. तर पहिला आठवडा संपेपर्यंत कमाई ८५.६५ कोटी रुपयांवर पोहोचली. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाच्या कमाईत काहीशी घट झाली असली, तरी त्याने आणखी ४५.६७ कोटी रुपये कमावले.
दरम्यान, 'द ओडिसी' सोबतच बॉक्स ऑफिसवर ‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ आल्याने नव्या रिलीजचा परिणाम दिसून आला. द ओडिसी रिलीज होऊन १४ दिवस झाले होते. तोपर्यंत स्पायडर मॅन दाखल झाला. २९ जुलै रोजी द ओडिसीने ४.४६ कोटी रुपयांची कमाई केली. मात्र, ३० जुलैला हा आकडा थेट २.७९ कोटी रुपयांवर आला.
मात्र, त्यानंतर चित्रपटाने पुन्हा वेग पकडला. ३१ जुलै रोजी कमाई ३.४१ कोटी रुपयांपर्यंत वाढली. त्यानंतर १ ऑगस्टला ५.६६ कोटी, तर २ ऑगस्टला ५.७२ कोटी रुपयांचा व्यवसाय झाला. आठवड्याच्या उर्वरित दिवसांतही चित्रपटाने चांगली कामगिरी करत तिसऱ्या आठवड्यात एकूण २४.१५ कोटी रुपयांची कमाई केली.
पहिल्या आठवड्याच्या तुलनेत दुसऱ्या आठवड्यात द ओडिसीच्या कलेक्शनमध्ये ४६.६८ टक्क्यांची घट झाली. स्पायडर मॅनचे प्रभावी रिलीज असूनही द ओडिसीने आपला प्रेक्षकवर्ग टिकवून ठेवला.
चौथ्या आठवड्यातही कमाईची गती कायम
द ओडिसीच्या चौथ्या आठवड्याची सुरुवात समाधानकारक झाली आहे. ६ ऑगस्ट रोजी चित्रपटाने २.२३ कोटी रुपये कमावले. त्यानंतर ७ ऑगस्टला कमाई वाढून २.५४ कोटी रुपयांवर गेली. शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत चित्रपटाने अनुक्रमे ४.४९ कोटी आणि ४.३९ कोटी रुपयांची कमाई केली.
यामुळे चौथ्या वीकेंडमध्ये द ओडिसीने जवळपास ११.४२ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. आता ही कमाई १६ कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच वेगाने ‘द ओडिसी’ची घोडदौड सुरू राहिली, तर केवळ इंग्रजी आवृत्तीच्या कमाईतूनच चित्रपट १८० कोटी रुपयांचा लाईफटाईम कलेक्शनचा टप्पा गाठू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.