

मुंबई - ‘जारण’ चित्रपटातील प्रमोशनल साँग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. सोनाली कुलकर्णी आणि भार्गवी चिरमुले यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या या भयावह गाण्याला अमृता सुभाष, सिंधुजा श्रीनिवासन, मनीषा पांडरांकी, लक्ष्मी मेघना यांचा आवाज लाभला आहे. वैभव देशमुख यांचे बोल तर ए व्ही प्रफुल्लचंद्र यांचे संगीत आहे.
निर्माते अमोल भगत म्हणतात, “या गाण्यातून आम्ही ‘जारण’ची भीतीदायक आणि सोबतच भावनिक बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. संगीत, गायन आणि व्हिज्युअल्स यांचे जबरदस्त मिश्रण प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आणणारे आहे. या गाण्याची खास बाब म्हणजे सोनाली कुलकर्णी व भार्गवी चिरमुले या गाण्यात पाहायला मिळत आहेत.”
संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र म्हणतात, “ ‘जारण’चे प्रमोशनल साँग तयार करताना चित्रपटाचा मूड लक्षात घेऊनच हे गाणे करायचे होते. चित्रपटाची संकल्पना कुठेही विस्कळीत होणार नाही याची काळजी घायची होती. त्यामुळे हे जरा आव्हानात्मक होते. ''
सोनाली कुलकर्णी म्हणते, ‘’माझ्यासाठी हा अनपेक्षित अनुभव होता. काय गाणे असेल, आपण कोणत्या झोनमध्ये जाणार आहोत, याची मला काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे माझ्यासाठी हा सुखद धक्का होता. या प्रमोशनल साँगचा झोन खूप वेगळा आहे. गाण्याचे बोल अहिराणी भाषेत असल्याने शब्द सहज कळत नाहीत. त्यामुळे ते जाणून घेण्याची उत्सुकता वाढते. शिवाय सोबत भार्गवी आहे. खूप वर्षांनी एकत्र काम करत आहोत. आवडती माणसं असल्याने काम करताना खूप मजा आली.’’
भार्गवी चिरमुले म्हणते, ‘’माझ्यासाठी हा खूप वेगळा आणि छान अनुभव आहे. एकतर कधीही न साकारलेली भूमिका मी केली आहे. चित्रपटाविषयी मी ऐकून होते आणि सगळ्यांसारखीच उत्सुकता मलाही होती. गाण्याचे बोल, संगीत, चित्रीकरण सगळेच अप्रतिम आहे.’’
अनिस बाझमी प्रॅाडक्शन्स प्रस्तुत, ए अँड एन सिनेमाज, एलएलपी यांच्या सहयोगाने आणि ए३ इव्हेंट्स अँड मिडिया सर्व्हिस निर्मित ‘जारण’ चित्रपट येत्या ६ जून २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हृषीकेश गुप्ते यांनी केले असून अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी यांनी निर्मिती केलीय. मनन दानिया सहनिर्माते आहेत. चित्रपटात अभिनेत्री अमृता सुभाष व अनिता दाते यांच्या प्रमुख भूमिका असून किशोर कदम, ज्योती माळशे, विक्रम गायकवाड, राजन भिसे, अवनी जोशी, सीमा देशमुख यांचाही दमदार अभिनय पाहायला मिळणार आहे.