

director Amit rai on Chhatrapati Shivaji Maharaj movie
मुंबई - दिग्दर्शक अमित राय यांनी खुलासा केला की, शाहिद कपूर स्टारर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील त्यांच्या महत्त्वाकांक्षी चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले आहे. अमित राय हे १८० कोटी रुपयांचा ब्लॉकबस्टर 'ओएमजी २' देणारे दिग्दर्शक आहेत. आता त्यांनी हा चित्रपट का थांबवण्याचा निर्णय घेतला, याबद्दल स्पष्टच सांगितलं आहे. अमित राय यांनी या व्यवस्थेला 'क्रूर' म्हणत निराशा व्यक्त केलीय.
शाहिद 'अर्जुन उस्तारा' चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याच्या आगामी चित्रपटांमुळे त्याची चर्चा होत असताना दुसरीकडे मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित बायोपिक थांबवल्याचे वृत्त समोर आले आहे. शाहिद कपूरचा मागील चित्रपट 'देवा' होता. बॉक्स ऑफिसवर फारशी जादू न दाखवू शकलेल्या या चित्रपटानंतर फॅन्सना त्याच्या पुढील चित्रपटाची प्रतीक्षा होती.
एका वेबसाईटशी बोलताना दिग्दर्शक अमित राय म्हणाले, "ही व्यवस्था खूप क्रूर आहे. तुमच्यासाठी इथे १८० कोटी चित्रपटासोबत (OMG 2) तुमची क्षमता सिद्ध करणे पुरेसे नाहीये. कास्टिंग, प्रोडक्शन, स्टार आणि मॅनेजमेंटच्या या व्यवस्थेत एक दिग्दर्शक कसे काम करू शकेल? तुम्ही ५ वर्षांपर्यंत एका कथेसोबत जिंकला आहात.आणि काही मिनिटात कुणीतरी ५ पानांची एक पुस्तिका लिहून तुम्हाला देतो की, चित्रपटात काय चूक आणि काय बरोबर."
अमित राय यांनी २०२४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर एक ऐतिहासिक ड्रामा चित्रपट बनवण्याची आपली इच्छा जाहिर केली होती. तेव्हा सर्व काही ठरलं होतं. यामध्ये शाहिद कपूर मुख्य भूमिका साकारणार होता. पण, १ वर्षात काही गोष्टी बदलल्या. अमित यांनी सांगितलं की, ते कशाप्रकारे बॉलीवूडच्या क्रूर व्यवस्थेचे बळी झाले आहेत.
अमित राय त्यांचा आगामी चित्रपटावर काम करत आहेत. अभिनेते पंकज त्रिपाठी देखील या चित्रपटात असतील. अक्षय कुमारनेही नव्या चित्रपटाच्या कथेत इंटरेस्ट दाखवला होता. अक्षयने त्यांना विचारलं होतं की, त्यांनी चित्रपटाचा प्रस्ताव त्याला का दिला नाही. याबाबत अमित यांनी सांगितले की, हे दोन्ही कलाकार खूप उदार आहेत, जे बॉलीवूडमध्ये मिळणे खूप दुर्लभ आहे.