

Samsara The Womb Movie Sayali Sanjeev Rishi Saxena
मुंबई : अत्यंत वेगळ्या धाटणीचा, दमदार स्टारकास्ट असलेला समसारा हा चित्रपट २० जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाचं अतिशय धीरगंभीर असं टीजर पोस्टर लाँच करण्यात आलं असून, 'समसारा' सध्याच्या मराठी चित्रपटसृष्टीत उल्लेखनीय चित्रपट ठरणार आहे.
संचय प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘समसारा’ची निर्मिती पुष्कर योगेश गुप्ता यांनी केलीय. दिग्दर्शनाची जबाबदारी सागर लढे यांनी सांभाळली आहे. कथा सागर लढे, विश्वेश वैद्य आणि समीर मानेकर यांची असून, पटकथा सागर लढे आणि समीर मानेकर यांनी लिहिली आहे. तर समीर मानेकर, निहार भावे यांनी संवादलेखन केलं आहे. विश्वेश वैद्य यांनी संगीत, अक्षय राणे छायांकनाची जबाबदारी निभावत आहेत. सायली संजीव, ऋषी सक्सेना, पुष्कर श्रोत्री, डॉ गिरीश ओक, नंदिता धुरी, प्रियदर्शनी इंदलकर, तनिष्का विशे, यशराज डिंबळे, कैलास वाघमारे, साक्षी गांधी अशी उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात आहे. कार्यकारी निर्माता म्हणून महेश भारंबे व अन्वय नायकोडी काम पाहणार आहेत.
'देव, दानव, असुर, मानव यांच्यातला एक पडला तरी दुसरा उभा राहतो. हे चक्र सुरू राहतं. पण हे चक्र थांबवायला काळ स्वतः जागा होतोय. आम्ही येतोय....' असे शब्द धीरगंभीर आवाजात ऐकू येतात आणि त्यातून समसारा चित्रपटाचं पोस्टर साकारलं आहे. अत्यंत कल्पक असं हे पोस्टर असून, त्यातून चित्रपटाच्या कथानकाचा नेमका अंदाज बांधता येत नाही. अतिशय सूचक अशा प्रकारचं हे पोस्टर आहे. त्यामुळे दमदार स्टारकास्ट असलेल्या समसारा या चित्रपटाविषयी उत्सुकता प्रचंड वाढली आहे. हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी २० जूनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.