

New Cast will seen in upcoming Mangalashtak Returns Movie
मुंबई : प्रेमकथा हा चित्रपटसृष्टीचा सर्वाधिक आवडता विषय...त्यामुळे अनेक प्रेमकहाण्या आजवर पडद्यावर आल्या आहेत. मात्र, सुलट प्रेमाची उलट गोष्ट ही अनोखी टॅगलाईन असलेला 'मंगलाष्टका रिटर्न्स' हा नवा चित्रपट २३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी घटस्फोट सोहळ्याचे एक अनोखे टीजर पोस्टरही सोशल मीडियावार चांगलेच चर्चेत आले होते. दमदार स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं आहे.
शारदा फिल्म्स प्रोडक्शनच्या वीर कुमार शहा यांनी निर्मिती केलेल्या "मंगलाष्टका रिटर्न्स" या चित्रपटाचं दिग्दर्शन योगेश पांडुरंग भोसले यांनी केलं आहे. डॉ. भालचंद्र यांनी कथा आणि संवादलेखन, पी. शंकरम यांनी संगीत दिग्दर्शन, विकास सिंह यांनी छायांकन, एस. विक्रमन यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. चित्रपटात वृषभ शाह, शीतल अहिरराव ही नवी जोडी पाहायला मिळणार आहे. त्यांच्यासह प्रसाद ओक, आनंद इंगळे, सक्षम कुलकर्णी, सोनल पवार, कमलेश सावंत, सुनील गोडबोले, प्रसन्न केतकर, प्राजक्ता नवले, भक्ती चव्हाण, शीतल ओसवाल, श्वेता खरात, समीर पौलस्ते यांच्याही भूमिका आहेत.
राजकीय विरोधाची पार्श्वभूमी असलेल्या दोन कुटुंबातील तरुण-तरुणी एकाच कॉलेजमध्ये एकत्र येतात. मात्र, त्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय काय घडामोडी घडत जातात याची रंजक कहाणी "मंगलाष्टका रिटर्न्स" या चित्रपटात पहायला मिळणार आहे. सुलट प्रेमाची उलट गोष्ट या टॅगलाईनमुळे या गोष्टीत अनेक ट्विस्ट असणार आहेत याचा नक्कीच अंदाज बांधता येतो आहे. त्यामुळेच या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटाच्या पोस्टरचा लुकही अगदी फ्रेश आहे. त्यामुळे ही गोष्ट अनुभवण्यासाठी २३ मेपर्यंत प्रेक्षकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.