

Upcoming Banjara Movie release date
पुढारी ऑनलाईन डेस्क - व्ही. एस. प्रॉडक्शन्स निर्मित आणि मोरया प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘बंजारा’ हा चित्रपट येत्या १६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. मैत्री आणि आत्मशोध यांचा सुंदर मेळ असणाऱ्या 'बंजारा' या चित्रपटातील ‘होऊया रिचार्ज’ हे स्फूर्तिदायी गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. यामध्ये तीन मित्रांची मोटरसायकलवरील अनोखी सफर दाखवण्यात आली आहे. बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक शान आणि अवधूत गुप्ते यांच्या कमाल आवाजातील या गाण्याला गुरू ठाकूर यांच्या शब्दांची आणि अवधूत गुप्ते यांच्या संगीताची जोड लाभली आहे.
स्नेह पोंक्षे, सक्षम कुलकर्णी आणि आदित्य धनराज यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या या गाण्यात मित्रांची धमाल दिसत असतानाच निसर्गसौंदर्यही अनुभवायला मिळत आहे. प्रत्येकाला आपल्या मैत्रीची आठवण करून देणारे हे गाणे पाहायला जितके सुखावह आहे तितकेच श्रवणीय आहे.
दिग्दर्शक स्नेह पोंक्षे म्हणतात, 'होऊया रिचार्ज' या गाण्यात केवळ प्रवासच नाही तर आत्मशोध घेण्याची प्रेरणा देण्यात आली आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यात जिथे आपण थोडे थांबून स्वतःकडे पाहणे विसरतो, तिथे हे गाणे थोडे थांबायला आणि रिचार्ज व्हायला सांगते. गाणे तयार करताना प्रत्येक फ्रेममध्ये ती सफर जिवंत वाटावी, यासाठी खूप मेहनत घेतली आहे. हे गाणे ऐकून प्रेक्षकांना मित्रांसोबत असा एखादा प्रवास करावा, असे वाटल्याशिवाय राहणार नाही. "
प्रस्तुतकर्ता शरद पोंक्षे म्हणतात, ‘होऊया रिचार्ज’ या गाण्यातून आम्हाला ऊर्जा आणि सकारात्मकता प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची आहे. काहींना हे गाणे नॉस्टॅलजिक बनवेल तर काहींना आपल्या मित्रांसोबत एखाद्या सहलीचे आयोजन करण्याची इच्छा निर्माण होईल.
'बंजारा' चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन स्नेह पोंक्षे यांनी केले आहे. या चित्रपटात शरद पोंक्षे, भरत जाधव, सुनील बर्वे, स्नेह पोंक्षे, सक्षम कुलकर्णी आणि आदित्य धनराज यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर रोहिणी विजयसिंह पटवर्धन निर्माती असून शरद पोंक्षे प्रस्तुत हा चित्रपट १६ मे ला प्रदर्शित होत आहे.