

Salman Khan:
मुंबई: बॉलीवूड अभिनेता सलमान खान याच्या सोशल मीडियावरील एका पोस्टची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होती. "मी एकटा आणि एकाकी आहे," अशा आशयाची पोस्ट सलमानने केल्यानंतर त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, आता या संपूर्ण प्रकरणावर खुद्द सलमानने मौन सोडले असून, ती पोस्ट स्वतःबद्दल नव्हती, असे स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे या व्हायरल बातमीमुळे त्याची आई सलमा खान देखील चिंतेत पडल्याचे सलमानने सांगितले.
आपल्या भावना स्पष्ट करताना सलमानने सोशल मीडियावर एक नवी पोस्ट शेअर केली आहे. यात तो म्हणतो, "अरे यार, मी स्वतःबद्दल बोलत नव्हतो. माझ्याकडे एवढे मोठे आणि सुंदर कुटुंब असताना, एवढे चांगले मित्र असताना मी एकटा कसा असू शकतो? आणि तुम्ही सगळे चाहते, तुमच्या शुभेच्छा आणि प्रार्थना माझ्यासोबत असताना मी एकाकी कसा पडू शकेन? जर मी तसा विचार केला तर मी जगातला सर्वात कृतघ्न माणूस ठरेन."
पुढे मिश्कीलपणे कारण सांगताना सलमान म्हणाला, "कधीकधी सतत लोकांच्या गराड्यात राहून कंटाळा येतो, त्यामुळे स्वतःसाठी थोडा वेळ हवा असतो, बस्स एवढंच!"
या संपूर्ण प्रकरणावर माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांची सलमानने आपल्या खास शैलीत फिरकी घेतली. तो म्हणाला, "यावेळी तर मी कोणताही फोटो न टाकताही तुम्ही लोकांनी त्याची 'ब्रेकिंग न्यूज' करून टाकली. मीडियामधील हेडलाईन्स पाहून माझी आईसुद्धा काळजीत पडली आणि तिने मला विचारलं, 'बेटा काय झालं?' त्यामुळे सगळ्यांना एकच सांगणं आहे की, चिल करा यार!"
काही दिवसांपूर्वी सलमानने आपला एक शर्टलेस फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये तो आपली टोन्ड बॉडी दाखवताना दिसला. पण त्या फोटोपेक्षा त्याच्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले होते. सलमानने लिहिले होते, "स्वतःसोबत राहण्याचे दोन मार्ग असतात एकटे असणे आणि एकाकी असणे. एकटे असणे हा स्वतःचा निर्णय असतो, तर एकाकी असणे म्हणजे जेव्हा तुमच्यासोबत कोणालाही राहण्याची इच्छा नसते, आता यापुढे काय, ते तुम्हीच ठरवा." सलमानच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी त्याच्या मानसिक आणि भावनिक स्थितीबद्दल चिंता व्यक्त करण्यास सुरुवात केली होती.
सलमान लवकरच 'मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 'सलमान खान फिल्म्स'च्या बॅनरखाली निर्मिती होत असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अपूर्व लाखिया करत असून यात चित्रांगदा सिंग मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शौर्य आणि त्यागाची कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. याशिवाय सलमान सध्या दिग्दर्शक वंशी पैदीपल्ली यांच्या 'SVC63' या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असून, यामध्ये दाक्षिणात्य स्टार नयनतारा त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.