Salman Khan Bigg Boss 20
मुंबई: बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान सध्या 'बिग बॉस २०'मुळे प्रचंड चर्चेत आहे. नुकत्याच झालेल्या 'वीकेंड का वार' भागात जेव्हा सलमान खानच्या छातीत अचानक वेदना होऊ लागल्या, तेव्हा त्याचे चाहते आणि शोमधील स्पर्धक घाबरले. सलमान वेदनेने विव्हळताना दिसला आणि त्याने सेटवरच डॉक्टरांना बोलावण्यास सांगितले. त्याची अवस्था पाहून सर्वांनाच काळजी वाटली. आता सलमानने आपल्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे.
सलमान खानची तब्येत आता पूर्णपणे ठीक असून घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. त्याने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना आरोग्याविषयी माहिती दिली. त्याने लिहिले आहे की, "देवाची कृपा आणि तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने माझी तब्येत एकदम उत्तम आहे. 'बिग बॉस'चा प्रोमो ज्या पद्धतीने एडिट करण्यात आला होता, तो तसा करायला नको होता. यामुळे त्या प्रसंगाचा मूळ उद्देशच संपला. मीसुद्धा तेच करतोय असे वाटू लागले, जे काझी घरात करत होता."
"काझीला त्याने जे केले ते चुकीचे होते हे दाखवून देणे हाच माझा एकमेव उद्देश होता. कारण त्याने स्वतःच्या आरोग्याचा वापर मनोरंजनासाठी केला, विशेषतः जेव्हा घरातील उर्वरित १५ सदस्यांना तो फक्त नाटक करत आहे हे माहीतच नव्हते आणि ते सर्व त्याच्या आरोग्याबाबत चिंतेत होते. प्रोमो ज्या प्रकारे एडिट केला गेला त्याबद्दल मी माफी मागतो. वाटतंय शोचा प्रचार करण्याची त्यांची हीच पद्धत आहे; मी त्यांच्या वतीने तुमची माफी मागतो."
यासोबतच सलमानने आणखी एक पोस्ट शेअर करत 'बिग बॉस'चे आभार मानले. सलमान खानने लिहिले, "'बिग बॉस'ने ही चूक दुरुस्त केली आहे. थँक्यू बिग बॉस." आता सलमान खान पूर्णपणे बरा असल्याचे स्पष्ट झाले आहे. काझीला धडा शिकवण्यासाठी, म्हणजेच त्याच्या चुकीची जाणीव करून देण्यासाठीच सलमानने आजारपणाचे नाटक केले होते.
'बिग बॉस २०'च्या 'वीकेंड का वार'मध्ये सलमान खान जेव्हा स्पर्धकांशी संवाद साधत होता, तेव्हा अचानक त्याच्या छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या. पहिल्यांदा वेदना झाल्यावर त्याने पाणी मागितले. पाणी प्यायल्यानंतर स्वतःला सावरून सलमान पुन्हा स्पर्धकांशी बोलू लागला. मात्र, थोड्याच वेळात त्याच्या छातीत पुन्हा दुखू लागले आणि तो बोलता बोलता शांत झाला. सलमानला वेदनेने त्रस्त पाहून घरातील सर्व सदस्य घाबरले. वेदना इतक्या वाढल्या होत्या की, त्याने सेटवरच डॉक्टरांना बोलावण्यास सांगितले.