Nila Vikhe Patil
मुंबई: अहिल्यानगर ते स्वीडनची संसद असा प्रवास करणाऱ्या महाराष्ट्राच्या कन्या निला विखे पाटील यांची स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून निवड झाली आहे. ग्रीन पार्टीच्या नेत्या असलेल्या निला यांनी स्टॉकहोम सिटी मतदारसंघातून विजय मिळवला. स्वीडनमधील डाव्या विचारांच्या विरोधी पक्षांनी अल्पमताने बहुमत मिळवल्यानंतर निला यांचा ३४९ सदस्यांच्या रिक्सडॅगमध्ये प्रवेश झाला आहे.
स्वीडनमध्ये जन्मलेल्या निला यांचे बालपणातील काही वर्षे अहिल्यानगरमध्ये गेले. त्यानंतर त्या स्वीडनमध्ये परतल्या आणि त्यांनी तेथील राजकारणात सक्रिय सहभाग घेतला. निला या महाराष्ट्रातील शिक्षणतज्ज्ञ अशोक विखे पाटील यांच्या कन्या आणि माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्या नात आहेत. भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या त्या पुतणी आहेत.
निला गेल्या अनेक वर्षांपासून स्वीडनच्या राजकारणात सक्रिय आहेत. माजी पंतप्रधान स्टीफन लोफव्हेन यांच्या कार्यकाळात त्यांनी पंतप्रधान कार्यालयात सल्लागार म्हणून काम केले. यावेळी वित्त, करप्रणाली आणि गृहनिर्माणाशी संबंधित विषयांवर त्यांनी काम पाहिले.
यानंतर त्यांची स्टॉकहोम सिटी कौन्सिलवर निवड झाली. तसेच ग्रीन पार्टीच्या शहरातील निवडणूक समितीतही त्यांनी काम केले. स्वीडिश यंग ग्रीन्स, ग्रीन पार्टी गोथेनबर्ग आणि ग्रीन स्टुडंट्स ऑफ स्वीडन यांसारख्या संघटनांमध्येही त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. पक्षाच्या स्टॉकहोम युनिटच्या कार्यकारी समितीच्या सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. निला यांनी गोथेनबर्ग स्कूल ऑफ बिझनेसमधून अर्थशास्त्र आणि कायद्याचा अभ्यास केला असून, त्यांच्याकडे पदवी आणि एमबीए आहे. तसेच त्यांनी माद्रिद येथील कॉम्प्लुटेन्स विद्यापीठातही शिक्षण घेतले आहे.
स्वीडनमध्ये राहून आणि राजकारणात सक्रिय असूनही भारताशी आपले नाते आजही तितकेच घट्ट असल्याचे निला यांनी सांगितले. “मला भारत खूप प्रिय आहे. भारताशी माझे अतिशय जवळचे नाते आहे. माझे अनेक जवळचे भारतीय मित्र आहेत,” असे त्या म्हणाल्या.
विखे पाटील कुटुंबाचा राज्यातील राजकारण, शिक्षण आणि सहकार क्षेत्राशी दीर्घकाळ संबंध आहे. निला यांचे पणजोबा विठ्ठलराव विखे पाटील यांनी आशियातील पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन केला होता. बाळासाहेब विखे पाटील यांच्याशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याची आठवणही निला यांनी सांगितली. “मला माझ्या आजोबांची खूप आठवण येते. त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काही वर्षांत ते जवळपास दर आठवड्याला मला फोन करायचे,” असे त्यांनी सांगितले.