सचिन खेडेकर घेऊन येताहेत ‘कोण होणार करोडपती’चं नवं पर्व!

सचिन खेडेकर घेऊन येताहेत ‘कोण होणार करोडपती’चं नवं पर्व!

Published on

मुंबई; पुढारी ऑनलाईन : सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती' हा बहुचर्चित कार्यक्रम ६ जूनपासून चाहत्याच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमातून सामान्य माणसाला आपल्या ज्ञानाच्या जोरावर करोडपती होण्याची संधी मिळत असते. 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळतो. मागील वर्षी देखील या कार्यक्रमाच्या पर्वात अनेक ज्ञानी स्पर्धक सहभागी झाले होते आणि मोठी रक्कम त्यांनी जिंकली होती. यावर्षी देखील संपूर्ण महाराष्ट्रातून उत्तम स्पर्धक सहभागी होणार आहेत. 'आता आली आहे आपली वेळ, ज्ञान आणि मनोरंजन यांचा अद्भुत खेळ', असे या वेळच्या पर्वाचं ब्रीदवाक्य आहे.

'कोण होणार करोडपती' या लोकप्रिय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुन्हा एकदा प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर करणार आहेत. ते एक अष्टपैलू कलाकार आहेत. त्याचबरोबर त्यांच्याकडे उत्तम संवाद कौशल्य आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून स्पर्धक येत असतात. आणि येणाऱ्या प्रत्येकाशी ते खूप आपलेपणाने बोलत असल्याने स्पर्धकांना ते लगेच आपलेसे वाटतात. त्यांच्या या स्वभाववैशिष्ट्यामुळे हॉटसीटवर बसलेल्या स्पर्धकाला मानसिक धीर देणं हे काम ते मोठ्या खुबीने करतात. त्याचबरोबर स्पर्धकांना बोलतं करून त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यास त्यांची खूप छान मदत होते. सचिन खेडेकर हे मनोरंजन क्षेत्रातील खूप मोठं नाव असल्याने ज्ञानार्जन आणि मनोरंजन या दोन्हींची ते उत्तम सांगड घालतात.

'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाच्या पर्वात यंदा ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा, प्रसिद्ध अभिनेत्री काजोल, प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांच्यासारखे अनेक मान्यवर उपस्थितीत राहणार आहेत. सोनी मराठी वाहिनीवरचा 'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम आता महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचला आहे. तुमचं ज्ञान तुम्हांला यशाच्या शिखरावर पोचवू शकतं, हे या कार्यक्रमातून सिद्ध झालं आहे. या कार्यक्रमाचं नवं पर्व येत्या ६ जूनपासून चाहत्याच्या भेटीला येणार आहे. माणूस कोणत्याही मोठ्या संकटात सापडला, तर त्याचं ज्ञानच त्याला त्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करू शकतं.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, खेड्यापाड्यातून स्पर्धक या कार्यक्रमात सहभागी होत असतात. 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमात याच ज्ञानाच्या साथीनी स्पर्धक एक करोड रुपये जिंकू शकतात. सामान्य माणसानं आपल्या ज्ञानाच्या बळावर पैसे जिंकून आपली स्वप्नपूर्ती करावी, हाच या कार्यक्रमाचा हेतू आहे. विविध क्षेत्रातले आणि वेगवेगळ्या वयोगटातले स्पर्धक यंदा सहभागी झाले आहेत. यावेळी ज्ञान आणि मनोरंजनाचा अनोखा मेळ पाहता येणार आहे. या पर्वात बहुमताचा कौल, व्हिडिओ अ फ्रेंड आणि बदली प्रश्न या तीन लाइफलाइन्स असणार आहेत. बदली प्रश्न या लाइफलाइनमध्ये एखाद्या प्रश्नाच्या उत्तराबाबत स्पर्धकाला आत्मविश्वास नसेल तर बदली प्रश्न ही लाईफलाईन वापरून प्रश्न बदलू शकतो.

'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाविषयी चाहत्यामध्ये उत्सुकता आहे. यंदा संपूर्ण महाराष्ट्रातून ६ लाखांपेक्षा अधिक फोन नोंदणी केली आहे. या वेळी चाहत्याच्या ज्ञानवृद्धीबरोबर त्यांचे दर्जेदार मनोरंजन करण्याचाही कार्यक्रमाचा प्रयत्न असणार आहे. त्याचबरोबर यंदाही समाजाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्य व्यक्तींची भेट 'कोण होणार करोडपती'मध्ये होणार आहे. दर शनिवारच्या भागात ही मंडळी सहभागी होणार आहेत.

मागच्या वर्षी नाना पाटेकर, आनंद शिंदे, यजुर्वेंद्र महाजन, मनोज वाजपेय, सयाजी शिंदे, मेधा पाटकर, सोनाली कुलकर्णी, कनिका राणे यांसारखी मंडळी कर्मवीर विशेष भागात सहभागी झाली होती. या पर्वातही निरनिराळ्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना बोलवण्यात येणार आहे. त्यामुळे चाहत्याना दर आठवड्याला रंगतदार भाग बघायला मिळणार आहेत. त्याचबरोबर या पर्वात १८ वर्षांची एक तरुण मुलगी आणि ७० वर्षांची एक व्यक्ती देखील सहभागी झाली आहे. आणि इतर सहभागी स्पर्धकांमध्ये डॉक्टर, पोलीस उपनिरीक्षक, महिला बस चालक, स्टँडअप कॉमेडियन, एमपीएसी किंवा यूपीएससी पास झालेले विद्यार्थी, आर्मी ऑफिसर, फॉरेस्ट ऑफिसर आणि अगदी रेडिओ अनौन्सरदेखील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून, खेड्यापाड्यांतून सहभागी झाले आहेत.

'कोण होणार करोडपती' आपल्या चाहत्यासाठी घरबसल्या भरघोस बक्षिसं जिंकण्याची संधी घेऊन आली आहे. 'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम टीव्हीवर पाहता-पाहता सोनी लिव्ह ॲपवर प्रेक्षक खेळू शकतात 'कोण होणार करोडपती प्ले अलॉंग' आणि जिंकू शकतात भरपूर बक्षिसं आणि हॉटसीटवर येण्याची संधी मिळते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news