सांगली : करगणीत अहिल्यादेवी होळकर यांचा फलक फाडल्याने तणाव | पुढारी

सांगली : करगणीत अहिल्यादेवी होळकर यांचा फलक फाडल्याने तणाव

आटपाडी; पुढारी वृत्तसेवा : करगणी येथे गुरुवारी रात्री अहिल्यादेवी होळकर यांचा फलक अज्ञाताने फाडला. या घटनेच्या निषेधार्थ आज (दि.३) करगणी बंद ठेवण्यात आले आहे. या घटनेमुळे करगणीत तणावाचे वातावरण असून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, करगणी गावात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अहिल्यादेवी होळकर चौकात फलक लावण्यात आला होता. गुरुवारी रात्री एका अज्ञाताने हा फलक फाडला. आज सकाळी करगणीतील ग्रामस्थांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर मोठ्या संख्येने युवक अहिल्या देवी होळकर चौकात जमा झाले. संतप्त युवकांनी करगणी बाजारपेठ बंद केली. आणि फलक फाडल्याचा निषेध नोंदवला. बंदमुळे अत्यावश्यक सेवा वगळता गावातील सर्व बाजारपेठ पूर्णतः बंद होती.

दरम्यान, पोलीस आणि चौकात जमा झालेल्या युवकांची खडाजंगी झाली. पोलिसांनी अरेरावीची भाषा वापरत हुज्जत घातल्याचा आरोप करत युवकांनी पोलिसांचा निषेध व्यक्त केला. पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी घटनास्थळी धाव घेत संतप्त युवकांची समजूत काढली. अहिल्यादेवी होळकर याचे फलक फाडणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याला अटक करण्याची ग्वाही दिल्याने जमाव शांत झाला.

राज्यात जातीय सलोख्यासाठी ओळखले जाणाऱ्या आटपाडी तालुक्यात जातीय तणाव वाढत चालला आहे. काही दिवसांपूर्वी नेलकरंजी येथे एका पक्षाचा झेंडा अज्ञात व्यक्तीने कापून नेला. त्यानंतर करगणीत अहिल्यादेवी होळकर यांचा फलक फाडण्यात आला. दोन्ही गावात घडलेल्या या घटनामुळे सामाजिक सलोखा आणि जातींमध्ये अंतर वाढत चालल्याचे दिसून आले. आगामी काळात जनतेने आणि सर्वपक्षीय नेत्यांनी सामाजिक सलोखा राखण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 हेही वाचलंत का ? 

 

Back to top button