Ramayana Jai Jai Ram Song: ‘रामायण’च्या पहिल्याच गाण्याने केला कहर! अरिजीत-श्रेयाच्या आवाजाने प्रेक्षक मंत्रमुग्ध; चाहते झाले भावूक

Ramayana Jai Jai Ram Song: नितेश तिवारी यांच्या बहुप्रतिक्षित ‘रामायण’ चित्रपटाच्या संगीत प्रवासाची सुरुवात ‘जय जय राम’ या भक्तिमय गाण्याने झाली आहे.
Ramayana Jai Jai Ram Song
Ramayana Jai Jai Ram SongPudhari
Published on
Updated on

Ramayana Jai Jai Ram Song: दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा बहुप्रतिक्षित पॅन-इंडिया चित्रपट ‘रामायण’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच मोठी उत्सुकता असताना आता निर्मात्यांनी त्याच्या संगीताची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आणली आहे.

‘जय जय राम’ या गाण्याने ‘रामायण’च्या संगीत प्रवासाची सुरुवात झाली आहे. ए. आर. रहमान यांच्या संगीताने सजलेल्या या भक्तिमय गीताला अरिजीत सिंह आणि श्रेया घोषाल यांनी आपला आवाज दिला आहे. तर डॉ. कुमार विश्वास यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. गाणे प्रदर्शित होताच सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली असून अनेक चाहते या गाण्यामुळे भावुक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर गाण्याची झलक

‘जय जय राम’ हे केवळ एक गाणे नसून ‘रामायण’च्या म्युझिकल कॅम्पेनमधील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर या कॅम्पेनची सुरुवात करण्यात आली. त्याआधी ‘सिया राम’ पोस्टरच्या माध्यमातून चित्रपटाची झलक दाखवण्यात आली होती.

‘जय जय राम’मध्ये राम-सीतेच्या विवाहापासून ते भगवान रामांनी पुत्र आणि कुटुंबातील सदस्य म्हणून पार पाडलेल्या कर्तव्यांपर्यंतच्या अनेक भावनिक प्रसंगांची झलक पाहायला मिळते. विशेषतः भरताने रामाच्या पादुका डोक्यावर घेतल्याचा प्रसंग प्रेक्षकांच्या भावनांना स्पर्श करणारा आहे.

अरिजीत-श्रेया यांच्या आवाजाची जादू

गाण्याची सुरुवात ‘अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम’ या भक्तिमय शब्दांनी होते. त्यानंतर श्रेया घोषाल यांच्या मधुर आवाजातून गाण्याला एक वेगळीच भावनिक उंची मिळते. पुढे अरिजीत सिंह यांच्या आवाजाची साथ मिळताच गाण्याचा प्रभाव आणखी वाढतो.

ए. आर. रहमान यांचे संगीत, डॉ. कुमार विश्वास यांचे शब्द आणि अरिजीत-श्रेया यांच्या आवाजाचा सुरेल संगम ‘जय जय राम’ला खास बनवतो. गाणे रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याचे व्हिडीओ आणि प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

रणबीर कपूरपासून सनी देओलपर्यंत तगडी स्टारकास्ट

‘रामायण’ची स्टारकास्ट ही देखील चित्रपटाच्या आकर्षणाचा मोठा भाग आहे. रणबीर कपूर भगवान श्रीराम यांच्या भूमिकेत, तर साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत दिसणार आहेत. यश रावणाची भूमिका साकारणार असून रवि दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सनी देओल भगवान हनुमानाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे.

त्यामुळे कलाकारांची निवड, भव्य निर्मिती, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि दमदार संगीत यामुळे ‘रामायण’कडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

Ramayana Jai Jai Ram Song
BJP MLA Video: 3,383 कोटींची संपत्ती, तरी रस्त्यावर भीक मागताना दिसला मुंबईतील भाजपचा आमदार; VIDEO होतोय व्हायरल, पण कारण काय?

ए. आर. रहमानसोबत हंस झिमरचीही साथ

‘रामायण’च्या संगीताची व्याप्ती केवळ भारतीय संगीतविश्वापुरती मर्यादित नसून आंतरराष्ट्रीय स्तरावरही आहे. ए. आर. रहमान यांच्यासोबत हॉलीवूडमधील प्रसिद्ध संगीतकार हंस झिमर यांचाही या चित्रपटाशी संबंध आहे.

त्यामुळे चित्रपटाच्या पार्श्वसंगीताकडून आणि आगामी गाण्यांकडूनही प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत. ‘जय जय राम’नंतर ‘रामायण’च्या पुढील गाण्यांची उत्सुकता आता आणखी वाढली आहे.

Ramayana Jai Jai Ram Song
Ganesh Chaturthi 2026: गणपतीची स्थापना करताना 'हे' मंत्र नक्की म्हणा; शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि नैवेद्याची संपूर्ण माहिती जाणून घ्या

दोन भागांत प्रदर्शित होणार ‘रामायण’

नितेश तिवारी यांचा ‘रामायण’ हा चित्रपट दोन भागांत प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा पहिला भाग नोव्हेंबर 2026 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. तर दुसरा भाग 2027 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

भक्ती, भावना, भव्यता, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि दमदार संगीत यांचा संगम असलेल्या या चित्रपटाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. आता ‘जय जय राम’नंतर ‘रामायण’ मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या मनावर किती प्रभाव पाडतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news