

BJP MLA Parag Shah Beggar Viral Video: राज्यात सध्या भाजप आमदार पराग शाह यांची जोरदार चर्चा सुरू आहे. घाटकोपर पूर्व मतदारसंघाचे आमदार पराग शाह यांचा भिकाऱ्याच्या वेषातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कोट्यवधी रुपयांची संपत्ती असलेले शाह अचानक रस्त्यावर भिकारी म्हणून फिरताना दिसल्याने हा प्रकार पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, यामागे एक खास कारण असल्याचे समोर आले आहे.
पराग शाह हे मुंबईतील तसेच महाराष्ट्रातील सर्वाधिक श्रीमंत आमदारांपैकी एक म्हणून ओळखले जातात. 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे तब्बल 3,383 कोटी रुपयांहून अधिक संपत्ती असल्याचे नमूद करण्यात आले होते. रिअल इस्टेट क्षेत्रात सक्रिय असलेल्या शाह यांनी यापूर्वी मुंबई महापालिकेचे नगरसेवक म्हणूनही काम केले आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमागील कारण आता समोर आले आहे. जैन धर्मातील चातुर्मासाच्या काळात पराग शाह यांनी आपल्या गुरुंच्या सांगण्यावरून एक दिवस भिकाऱ्याच्या वेषात राहण्याचा अनुभव घेतला.
जैन धर्मगुरू नम्रमुनी यांच्या सूचनेनुसार शाह यांनी आपली ओळख पूर्णपणे लपवली. त्यांनी साधे कपडे परिधान केले, चेहऱ्यावर मेकअप करून आपला नेहमीचा लूक बदलला आणि सुरक्षाव्यवस्था, गाडी तसेच इतर ऐषआरामाच्या वस्तू बाजूला ठेवून घाटकोपरच्या रस्त्यावर सामान्य भिकाऱ्याप्रमाणे फिरले.
या प्रयोगादरम्यान पराग शाह यांनी घाटकोपरमधील विविध भागांत काही तास घालवले. ते रस्त्याच्या कडेला बसले, लोकांकडे मदत मागितली आणि भिकाऱ्याच्या जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
विशेष म्हणजे, त्यांच्या वेषांतरामुळे अनेकांना ते कोण आहेत, याची कल्पनाही आली नाही. काही लोकांनी त्यांना मदत केली, तर काहींनी दुर्लक्ष केले. सामान्य नागरिक भिकाऱ्यांकडे कशा नजरेने पाहतात आणि रस्त्यावरचे जीवन किती वेगळे आहे, याचा अनुभव शाह यांनी या माध्यमातून घेतला.
या प्रयोगातील आणखी एक विशेष बाब म्हणजे, ज्या ठिकाणी त्यांनी भिकाऱ्याच्या रूपात लोकांशी संवाद साधला, त्याच ठिकाणी नंतर त्यांनी आपला मेकअप काढून पुन्हा भेट दिल्याचे सांगितले जाते.
या वेळी त्यांनी संबंधित लोकांशी संवाद साधून आपल्या अनुभवाबद्दल चर्चा केली. या संपूर्ण प्रयोगाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
पराग शाह यांच्या या प्रयोगामागे केवळ प्रसिद्धी मिळवण्याचा उद्देश नसून, सामान्य माणसाचे आणि विशेषतः रस्त्यावर जीवन जगणाऱ्या गरजू व्यक्तींचे वास्तव जवळून अनुभवणे, हा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.
कोट्यवधी रुपयांची संपत्ती आणि राजकीय ताकद असूनही एका दिवसासाठी सर्व काही बाजूला ठेवून भिकाऱ्याच्या भूमिकेत जगण्याचा अनुभव घेणे, हा प्रकार सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. पराग शाह यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यांच्या या प्रयोगाचे कौतुक केले आहे.