

Ramayana Movie Controversy: नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘Ramayana: Rise of a Legend’ या चित्रपटावरून नवा वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटात मूळ वाल्मिकी रामायणातील कथानक आणि पात्रांचे चुकीचे चित्रण करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. तसेच, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा दावा हिंदू जनजागृती समितीने केला आहे. या प्रकरणी समितीचे प्रवक्ते सतीश कोचरेकर यांनी मुंबईतील मुलुंड पश्चिम पोलीस ठाण्यात चित्रपटाचे निर्माते नमित मल्होत्रा आणि दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्याविरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे.
हिंदू जनजागृती समितीच्या म्हणण्यानुसार, रामायण हा केवळ मनोरंजनाचा विषय नाही. तर कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचा आणि संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. मात्र, या चित्रपटात रावणाचे चुकीच्या पद्धतीने उदात्तीकरण करण्यात आल्याचा आरोप समितीने केला आहे.
चित्रपटात रावणाला गरीबांना सोन्याची घरे देणारा, शोषितांना मदत करणारा आणि महिलांचा सन्मान करणारा व्यक्ती म्हणून दाखवण्यात आल्याचे समितीचे म्हणणे आहे. याउलट, प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण यांचे चित्रण कमकुवत दाखवण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
ताडका आणि खर-दूषण यांच्या राक्षसी सैन्यासमोर शस्त्रांनी सज्ज असलेले श्रीराम आणि लक्ष्मण घाबरून मागे हटताना दाखवले आहेत. तर दुसरीकडे, कोणतेही शस्त्र नसताना रावण मोठ्या सैन्याशी एकटाच निर्भयपणे लढताना दाखवण्यात आला आहे. यामुळे रावणाचे चुकीच्या पद्धतीने महिमामंडन होत असल्याचा आक्षेप समितीने घेतला आहे.
चित्रपटातील काही प्रसंगांवरही हिंदू जनजागृती समितीने आक्षेप घेतला आहे. शूर्पणखेचे नाक कापण्याच्या प्रसंगात माता सीता लक्ष्मणाला जाब विचारताना दाखवण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. कोणत्याही स्त्रीचे रूप विद्रूप करण्याचा अधिकार तुम्हाला नाही, अशा आशयाचे विधान सीतेच्या तोंडी घालण्यात आल्याचा आरोप आहे.
याशिवाय, प्रभू श्रीराम यांनी खर-दूषण या राक्षसांची माफी मागितल्याचा प्रसंगही चित्रपटात दाखवण्यात आल्याचे समितीचे म्हणणे आहे. हा प्रसंग मूळ रामायणात नसून तो काल्पनिक असल्याचा दावा करण्यात आला आहे.
तसेच, त्याग आणि निष्ठेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या लक्ष्मणाचे चित्रण उद्दाम आणि गुरुजनांची थट्टा करणाऱ्या व्यक्तीप्रमाणे करण्यात आल्याचा आरोपही तक्रारीत आहे. या बदलांमुळे रामायणातील पूजनीय पात्रांचा अपमान होत असल्याचे समितीने म्हटले आहे.
या प्रकरणी हिंदू जनजागृती समितीने भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 मधील कलम 299 आणि 196 अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कलम 299 हे धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने केलेल्या जाणीवपूर्वक आणि दुर्भावनापूर्ण कृत्यांशी संबंधित आहे. तर कलम 196 हे धर्माच्या आधारावर वेगवेगळ्या समूहांमध्ये तेढ निर्माण करण्याशी संबंधित आहे.
चित्रपटाचे निर्माते नमित मल्होत्रा, दिग्दर्शक नितेश तिवारी आणि या प्रकरणाशी संबंधित इतर जबाबदार व्यक्तींविरोधात एफआयआर दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी समितीने केली आहे.
केवळ तक्रार दाखल करून न थांबता, समितीने या प्रकरणाच्या सखोल तपासाचीही मागणी केली आहे. त्यासाठी चित्रपटाची संपूर्ण अधिकृत प्रत, पटकथा आणि संवाद पोलिसांनी ताब्यात घ्यावेत, असे तक्रारीत म्हटले आहे.
चित्रपटातील प्रसंगांची मूळ वाल्मिकी रामायणाशी तुलना करण्यासाठी रामायणाचे अभ्यासक, संस्कृत तज्ज्ञ आणि धर्मशास्त्राच्या जाणकारांची मदत घ्यावी, असेही समितीने सुचवले आहे.
कलात्मक स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा आणि पूजनीय व्यक्तिमत्त्वांचा अपमान सहन केला जाणार नाही, अशी भूमिका हिंदू जनजागृती समितीने घेतली आहे.
मुलुंड पोलिसांनी या तक्रारीची तातडीने दखल घेऊन निष्पक्ष तपास करावा आणि संबंधितांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी समितीने केली आहे.
अन्यथा लोकशाही आणि कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांकडून एफआयआर दाखल झाला आहे की नाही आणि चित्रपटाच्या निर्माते-दिग्दर्शकांची यावर काय भूमिका आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.