

'बिग बॉस १८' आणि 'द ५०' फेम सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रजत दलालने अचानक लग्नाचे फोटो शेअर करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. रंगाने पांढरी शेरवानी आणि लाल लेहेंग्यात हे जोडपे अत्यंत सुंदर दिसत आहे. विशेष म्हणजे, ज्या प्रिन्स नरुलासोबत रजतचा 'द ५०' शोमध्ये मोठा वाद झाला होता, त्यानेही आता सर्व विसरून रजतला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सोशल मीडियावरील आपल्या आक्रमक स्वभावासाठी आणि वादांसाठी ओळखला जाणारा 'बिग बॉस १८' फेम रजत दलाल आता एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. नेहमी वादाच्या भोवऱ्यात राहणाऱ्या रजतने आपल्या आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. रविवारी सायंकाळी रजतने आपल्या लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.
पार पडले 'सीक्रेट' लग्न
रजत दलालने उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे गंगा नदीच्या काठावर एका खासगी सोहळ्यात लग्नगाठ बांधल्याचे म्हटले जात आहे. त्याने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तो ऑफ-व्हाईट रंगाच्या शेरवानीमध्ये दिसत आहे, तर त्याच्या पत्नीने पारंपरिक लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. रजतने या फोटोंना "जीवनाच्या एका नवीन अध्यायाची सुरुवात... सर्वांचे आशीर्वाद असू द्या," अशी कॅप्शन दिली आहे.
या फोटोंवर विवियन डीसेना, आसिम रियाज, युविका चौधरी, शिव ठाकरे, उर्वशी ढोलकिया सह अनेक सेलेब्सनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. रजतने सुंदर पर्वत डेस्टिनेशन वेडिंग केले आहे.
रजत दलालची पत्नी कोण आहे?
रजत दलालने वेडिंग फोटोज पोस्ट केले आहे. त्याने आपल्या पत्नीचे नाव शेअर केलेले नाही किंवा तिची ओळख उघड केलेली नाही, ज्यामुळे चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रजतआणि त्याची पत्नी लॉन्ग रिलेशनशीपमध्ये होते. 'बिग बॉस १८' मध्ये रजतने एका एपिसोडमध्ये हा खुलासा केला होता की, त्याची गर्लफ्रेंड आहे. तसेच 'द ५०' मध्ये त्याने सांगितले होते की, त्याची गर्लफ्रेंड लवकरच पत्नी बनेल.
प्रिन्स नरुलासोबतचा वाद मिटला?
रजतच्या लग्नानंतरची सर्वात मोठी बातमी म्हणजे अभिनेता प्रिन्स नरुलाची प्रतिक्रिया होय. 'द ५०' या रिअॅलिटी शोमध्ये रजत आणि प्रिन्स यांच्यात टोकाचे वाद झाले होते. मात्र, रजतच्या लग्नाची बातमी कळताच प्रिन्सने एक व्हिडिओ शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. प्रिन्स म्हणाला, "भावा, लग्नाबद्दल तुझे खूप अभिनंदन! आता वहिनी आल्या आहेत, त्या तुला नक्कीच सांभाळतील आणि तुझा तबला वाजवतील. तुझ्या लग्नाची बातमी ऐकून माझा सगळा राग संपला आहे. जो काही वाद होता तो शोमध्ये तो संपला आङे. कुणाला तरी मोठं व्हावं लागणार होतं. म्हणून मी मोठ्या मनाने राग काढून टाकतोय."
मुनव्वर फारुकीची मजेशीर कमेंट
रजतच्या लग्नाच्या फोटो पोस्टवर 'बिग बॉस १७'चा विजेता मुनव्वर फारुकीने कमेंट केली आहे. रजतच्या रॅश ड्रायव्हिंगच्या जुन्या वादाची आठवण करून देत मुनव्वरने लिहिले, "गाडीचा वेग नियंत्रित करणारी व्यक्ती अखेर आली आहे!! माझ्या भावाला आणि वहिनीला खूप खूप अभिनंदन."