

Priya Berde negative role in next tv serial
मुंबई - मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे तब्बल १० वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत असून, त्यांच्या चाहत्यांसाठी ही एक मोठी आनंदाची बातमी आहे. स्टार प्रवाह या लोकप्रिय वाहिनीवर लवकरच सुरू होणारी नवीन भयपट मालिका ‘काजळमाया’ या माध्यमातून त्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
या मालिकेची खासियत म्हणजे, यात प्रिया बेर्डे एक रहस्यमय, गूढ आणि कधीही न पाहिलेली अशी भूमिका साकारणार आहेत. आतापर्यंत त्यांनी केलेल्या विनोदी आणि कुटुंबप्रधान भूमिकांपेक्षा ही भूमिका पूर्णतः वेगळी आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी ही एक नवीन अनुभव असणार आहे. पर्णिका नावाच्या चेटकीणीची गोष्ट म्हणजेच काजळमाया ही मालिका होय.
‘काजळमाया’ ही मालिका एक भय, थरार आणि अंधश्रद्धा यांच्या कथेवर आधारित आहे. यात ग्रामीण पार्श्वभूमीवर घडणाऱ्या गूढ घटनांचा मागोवा घेण्यात येणार आहे. प्रिया बेर्डे यांच्या पात्राभोवतीच कथानक फिरणार असून, त्यांच्या पात्रात अनेक थरारक वळणं आणि भावनिक गुंतागुंत असणार आहे. कनकदत्ता ही पर्णिकाची आई. सूड घेणारी असे तिचे व्यक्तीमत्व आहे.
प्रिया बेर्डे म्हणाल्या, मालिकेतील इतिहासामध्ये देखील अशी भूमिका नसेल. हे एक वेगळं पात्र साकारणं आव्हानात्मक आहे. मी खूप खुश होते की, ही भूमिका साकारायला मिळतेय. निगेटिव्ह भूमिका साकारणं हे देखील आनंद आहे. आपण वेगळं काही तरी करतोय. मनोरंजनाच्या माध्यमातून तो आम्ही सादर करतोय. मेकअप आर्टिस्टनी सुंदर मेकअप साकारलाय. अध्यात्मिक गोष्टींमध्ये वाटचाल करत असतो, तेव्हा निगेटिव्ह भूमिका आल्यानंतर ती भूमिका साकारणे, हेदेखील वेगळेपण आहे.
प्रिया बेर्डे यांची एन्ट्री पहिल्याच भागातच प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी असल्याचे म्हटले जात आहे.